‘त्या’ प्रकरणाचा तपास CBI कडे? जितेंद्र आव्हाडांच्या अडचणीत वाढ

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . २६ नोव्हेंबर । माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या अडचणीत आता पुन्हा वाढ होणार आहे. सोशल मीडियावर पोस्ट केली म्हणून अनंत करमूसेला केलेली मारहाण आव्हाडांना भोवणार आहे. या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने काल महत्त्वाचा निर्वाळा दिला आहे. तत्कालीन सरकारने या प्रकरणात तपास योग्य पद्धतीने न केल्याचं सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं आहे.

सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या या निर्वाळ्यानंतर या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे देण्यास राज्य सरकारने परवानगी दिली असल्याची माहिती समोर येत आहे. याच प्रकरणात मदत केल्यामुळे अनंत करमूसे आज किरिट सोमय्या यांची भेट घेणार आहेत. तसंच पुढील कायदेशीर लढाईत सहकार्य करावं यासाठी किरिट सोमय्या यांचं मार्गदर्शनही घेणार आहेत. अनंत करमुसे यांचे अपहरण आणि मारहाण प्रकरणाची चौकशी आता सीबीआयकडे दिली जाऊ शकते.

काय आहे प्रकरण –

अनंत करमुसे यांनी एप्रिल 2020 मध्ये तत्कालीन गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट केली होती. यानंतर जितेंद्र आव्हाड यांच्या सुरक्षारक्षक आणि काही कार्यकर्त्यांनी करमुसे यांना आव्हाड यांच्या निवासस्थानी नेलं. त्यानंतर आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांनी करमुसे यांना बेदम मारहाण केली होती. यावेळी याठिकाणी जितेंद्र आव्हाड देखील उपस्थित होते.

या घटनेनंतर करमुसे यांनी दाखल केलेल्या तक्रारीच्या आधारे वर्तकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांना अटकही केली होती. मात्र, नंतर त्यांना जामीन मंजूर करण्यात आला. आता या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाच्या निर्वाळ्यानंतर आव्हाड यांच्या अडचणी पुन्हा वाढण्याची शक्यता आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *