अमृता फडणवीस काहीच बोलल्या नाही; असं बोलणाऱ्यांच्या कानाखाली मारायला हवं- संजय राऊत

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . २६ नोव्हेंबर । महिलांनी साडी, सलवार सूट परिधान केल्यावर त्या सुंदर चांगल्या दिसतात, तसेच माझ्यासारखे त्यांनी कपडे परिधान केले नाही तरी चांगल्या दिसतात, असे वादग्रस्त विधान योगगुरू बाबा रामदेव यांनी शुक्रवारी ठाण्यात महिलांच्या योगशिबिरात केले. यावेळी रामदेव यांच्यासमवेत व्यासपीठावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस उपस्थित होत्या.

रामदेव बाबांच्या या वादग्रस्त विधानामुळे राज्यात विविध प्रतिक्रिया उमटत आहे. ठाकरे गटातील खासदार संजय राऊत यांनी देखील रामदेव बाबांवर निशाणा साधला आहे. योगगुरु रामदेव बाबा यांचे वक्तव्य हे लज्जास्पद आहे. रामदेव बाबांच्या शेजारी अमृता फडणवीस बसल्या होत्या. परंतु त्या काहीच बोलल्या नाहीत. कोणतीही आणि कितीही मोठी व्यक्ती असो, असं बोलणाऱ्यांच्या कानाखाली मारली पाहिजे, असं संजय राऊत म्हणाले. एकीकडे तुम्ही स्त्रियांच्या रक्षणाच्या गोष्टी करतात आणि त्याच वेळेला असंख्य महिलांसमोर एक बाबा भगव्या वस्त्रात महिलांचा अपमान करतो, हे खूप लज्जास्पद आहे, असंही संजय राऊत म्हणाले.

अमृता फडणवीस यांच्यात १०० व्या वर्षीही आपणास म्हातारपणाच्या खुणा दिसणार नाही, अशा शब्दांत रामदेव यांनी त्यांची स्तुती केली. त्या आनंदी राहतात, त्यांच्याकडे पाहाल तर त्या नेहमी लहान मुलांप्रमाणे हसतमुख राहतात, असेही ते म्हणाले. रामदेव बाबा यांनी अमृता फडणवीस यांना त्यांचा हसरा चेहरा आपल्याकडे करण्याची विनंती केली व त्यानंतर वरील वादग्रस्त वक्तव्य केले.

दरम्यान, ठाण्यातील ढोकाळी येथील हायलँड मैदानात आयोजक खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी शुक्रवारी नि:शुल्क योगशिबिर आणि महिला संमेलनाचे सकाळी पाच वाजता आयोजन केले होते. या कार्यक्रमाला अमृता फडणवीस यांच्यासह दीपाली सय्यद, आमदार रवी राणा आदींसह महिलावर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *