‘भाजपाने मनसेचं इंजिन पूर्णपणे ताब्यात घेतलंय’; काँग्रेसचं राज ठाकरेंना प्रत्युत्तर

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । २८ नोव्हेंबर । महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी रविवारी पक्षाचा मोठा मेळावा घेतला. या मेळाव्यात राज ठाकरेंनीमनसेच्या आतापर्यंतच्या आंदोलनांवर भाष्य केले. यावेळी त्यांनी मनसेकडून आंदोलनाची पुस्तिका काढणार असल्याची माहिती राज ठाकरेंनी यावेळी दिली. तसेच काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्यावरही राज ठाकरेंनी निशाणा साधला.

राहुल गांधी गुळगुळीत मेंदूचे आहेत. ते बोलतात तेव्हा मागून आरडी बर्मन बोलतात का असं वाटतं. सावरकरांवर बोलण्याची लायकी आहे का? कोण आहेत माहिती आहे का? कुठे ठेवलं होतं, काय हाल सहन केले. एक स्ट्रॅटेजी नावाची गोष्ट असते. आम्ही त्याचा विचार करत नाही. फक्त बोलणार दयेचा अर्ज केला. सर सलामत तो पगडी पचास, असं म्हणत राज ठाकरेंनी राहुल गांधींवर निशाणा साधला.

राज ठाकरेंच्या या टीकेवर काँग्रेसचे नेते सचिन सावंत यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. भाजपनं मनसेचं इंजिन पूर्णपणे ताब्यात घेतलं आहे, या भाषणानं शिक्कामोर्तब झालं. १६ वर्षात त्यांनी ज्या भूमिका बदलल्या त्याला जनतेचा पाठिंबा मिळत नाही. जनतेला त्या तर्कसंगत वाटत नाहीत. राजकीय यश मिळत नाहीत, याचं आत्मचिंतन करण्यापेक्षा ते दुसऱ्यांवर आणि माध्यमांवर खापर फोडत आहेत, अशी टीका सचिन सावंत यांनी केली.

सचिन सावंत पुढे म्हणाले की, ज्या पक्षाला जनतेला ब्लू प्रिंट देणार असं आश्वासन देऊन ती अजून देता आली नाही. ते स्ट्रॅटजीबद्दल बोलतात ही विरोधाभासी गोष्ट आहे, असं सचिन सावंत यांनी म्हटलं. ज्यांचा मेंदू भाजपकडे गहाण आहे त्यांनी राहुल गांधी यांच्या बुद्धीमत्तेबद्दल, लायकीवर बोलावं, ही दुर्दैवाची आणि हास्यास्पद असल्याचा टोला सचिन सावंत यांनी राज ठाकरेंना लगावला.

दरम्यान, कृष्ण निती काय सांगते. चांगली गोष्ट जर घडणार असेल, त्यासाठी खोटं बोलावं लागलं तर बोला, पण ती गोष्ट होणं गरजेचं आहे, असं राज ठाकरेंनी यावेळी सांगितलं. ज्याला स्ट्रॅटजी समजत नाही तो गुळगुळीत मेंदूचा. सगळ्या गोष्टी थांबणं आवश्यक आहे. काँग्रेसला जसं सांगणं आहे तसं भाजप आणि अन्य लोकांनाही सांगणं आहे. दोन्ही बाजूनं आमच्या सर्व लोकांना, ज्यांनी स्वातंत्र्यासाठी लढा दिला, महापुरूष म्हटले गेले, आयकॉन झाले, यांची बदनामी करून हाती काय लागणारे? असा सवालही त्यांनी केला. या देशासमोर अनेक प्रश्न उभे आहेत. अनेक मोहल्ले उभे राहतायत त्यातला सुरक्षेचा प्रश्न गांभीर्यानं ने घेता आम्ही एकमेकांची बदनामी करतोय, असंही ते म्हणाले.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *