महाविकास आघाडीत चौथा पक्ष? ठाकरे-आंबेडकरांची ‘ग्रँड’ चर्चा

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . ५ डिसेंबर । महाराष्ट्रात पुन्हा शिवशक्ती-भीमशक्तीचा प्रयोग पाहायला मिळण्याची शक्यता आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अध्यक्ष उद्धव ठाकरे आणि वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्यात खलबतं सुरु आहेत. मुंबईतील हॉटेल ग्रँड हयातमध्ये दोन पक्षांच्या प्रमुख नेत्यांच्या चर्चा सुरु आहेत. वंचित बहुजन आघाडीच्या रुपाने महाविकास आघाडीत चौथा पक्ष समाविष्ट होणार असल्याचं बोललं जात आहे.

आगामी मुंबई महापालिका, तसंच स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आंबेडकर-ठाकरेंची भेट महत्त्वाची मानली जात आहे. ही भेट गुप्त राखण्याचा प्रयत्न बाळासाहेब आंबेडकरांकडून करण्यात आला होता. या बैठकीत महाविकास आघाडीत सहभागी होण्यासंदर्भात प्राथमिक चर्चा होत असल्याची माहिती आहे.

शिवसेनेकडून उद्धव ठाकरे, विनायक राऊत आणि मिलिंद नार्वेकर, तर वंचितकडून प्रकाश आंबेडकर, त्यांचे सुपुत्र सुजात आंबेडकर बैठकीला हजर असल्याची माहिती आहे.

याआधी ठाकरे गटाचे नेते सुभाष देसाई आणि वंचित बहुजन आघाडीच्या शिष्टमंडळाच्या दोन बैठका झाल्याची माहिती आहे. त्यामुळे वरिष्ठ नेत्यांच्या बैठकीनंतर ठाकरे गट आणि वंचित यांच्या युतीवर आजच शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. बैठकीत युतीचा फॉर्म्युला ठरणार असल्याचं बोललं जात आहे.

दरम्यान, वंचित बहुजन आघाडीच्या रुपाने महाविकास आघाडीत चौथा पक्ष समाविष्ट होणार असल्याची माहिती आहे. याआधी वंचितने ठाकरे आणि काँग्रेस यांना युतीचा प्रस्ताव दिला होता. मात्र काँग्रेसकडून कुठलाही सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही. वंचित जर महाविकास आघाडीचा भाग होणार असेल, तर राष्ट्रवादी-काँग्रेस यांच्यासोबतही त्यांना जुळवून घ्यावे लागणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *