महामानवाला अभिवादन ; चैत्यभूमीवर उसळला ज्ञानाचा महासागर

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । ६ डिसेंबर। भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६६व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन करण्यासाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून लाखोंचा भीमसागर चैत्यभूमीवर लोटला आहे. तान्हुल्यापासून वयोवृद्धांपर्यंत सर्व वयोगटांतील अनुयायांच्या चैत्यभूमीवर रांगा लागल्या आहेत. पालिकेतर्फे या सर्वांसाठी विविध प्रकारच्या सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

करोनासंकटामुळे मागील दोन वर्षांपासून निर्बंध असल्याने मोठ्या संख्येने अनुयायांना चैत्यभूमीवर येता आले नाही. यंदा कोणतेही निर्बंध नसल्याने तीन दिवस आधीपासूनच लाखो अनुयायांचे चैत्यभूमीवर आगमन झाले आहे. चैत्यभूमीच्या दिशेने येणारे अनुयायांचे जथ्थेच्या जथ्थे व त्यांना शिस्तीने सोडणारे स्वयंसेवक, स्वयंसेवी संस्था, संघटना, चळवळीतील कार्यकर्ते, दादर रेल्वे स्थानक ते चैत्यभूमी-शिवाजी पार्कच्या दिशेने अत्यंत शिस्तीने चालणारे लाखो भीमसैनिक पोलिसांना सहकार्य करताना दिसत आहेत.

शिवाजी पार्क मैदानात धूळ उडून अनुयायांना त्रास होत असल्याने पालिकेने यंदा कृत्रिम हिरवळ मैदानात अंथरली आहे. अनुयायांसाठी शिवाजी पार्क येथे तात्पुरता निवारा, शामियाना उभारण्यात आला आहे. तसेच आपत्‍कालीन परिस्थितीत तात्‍पुरत्‍या निवाऱ्याची परिसरातील पालिकेच्‍या सहा शाळांमध्ये सोय करण्यात आली आहे. चैत्यभूमी परिसर, छत्रपती शिवाजी महाराज मैदान परिसर, दादर रेल्वे स्थानक, राजगृह (हिंदू कॉलनी), डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय (वडाळा) व लोकमान्य टिळक टर्मिनस (कुर्ला) येथे आवश्यक त्या सर्व नागरी सेवा-सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

पालिकेकडून सुविधांसह भोजनाची व्यवस्था उपलब्ध करण्यात आल्याने अनेकांनी समाधान व्यक्त केले आहे. विविध सामाजिक संस्था, संघटना, बँका, लोकप्रतिनिधींनीही अल्पोपहार व जेवणाची सोय केली आहे. अभिवादनासाठी जवळपास पाच ते सहा तास रांगेने उभ्या असणाऱ्या अनुयायांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. वाहतुकीसोबतच कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी मुंबई पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला आहे. पालिका प्रशासनाने दादर रेल्वे स्थानक ते चैत्यभूमीपर्यंतचा परिसर फेरीवालामुक्त केला आहे. त्यामुळे रस्त्यांनी मोकळा श्वास घेतला आहे.

पुस्तकांचे ३०० स्टॉल

चैत्यभूमी परिसरात प्रबोधनपर मार्गदर्शन शिबिरे, क्रांतीगीतांच्या ध्वनिफिती, बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज यांच्या साहित्य, महामानवाच्या प्रतीमा व पुतळे खरेदी करण्यासाठी स्टॅालवर गर्दी उसळली आहे. शिवाजी पार्क मैदान व इतरत्र सुमारे २०० ते ३०० पुस्तकांचे स्टॉल लावण्यात आले आहेत. राज्याच्या विविध भागांतून नामवंत प्रकाशन संस्थांनी यात सहभाग घेतला आहे. आंबेडकर, बुद्ध, यांसह पुरोगामी विचारधारेची लाखो पुस्तके येथे उपलब्ध आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *