महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । ८ डिसेंबर । देशाला हादरवून टाकणाऱ्या श्रद्धा वालकर हत्या प्रकरणात रोज नवनवीन खुलासे होत आहेत. आरोपी आफताब आपल्या कबुली जबाबात धक्कादायक माहिती देत आहे. रागाच्या भरात आपण श्रद्धाचा खून केल्याची त्याने कबुली दिली. तर आता श्रद्धाचे तुकडे शोधून दाखवा, असं आव्हान त्याने पोलिसांना दिलं आहे.
श्रद्धा वालकर खून प्रकरणी आरोपी आफताब अमीन पूनावाला याची नार्को आणि पॉलिग्राफ चाचणी करण्यात आली. यामध्ये त्याने आपल्या गुन्ह्याची कबुली दिली आहे. श्रद्धाने आपल्याला सोडण्याची धमकी दिली. तसंच ती आणखी एका तरुणासोबत डेटवर गेली. हा तरुण तिला बंबल या डेटिंग अॅपवर भेटला होता. याचा राग आल्याने त्या दोघांच्यात भांडणं झाली. पुढे हा वाद वाढल्यानंतर आफताबने श्रद्धाचा खून केला, अशी कबुली त्याने दिली आहे.
खून केल्यानंतर आफताबने श्रद्धाच्या मृतदेहाचे ३५ तुकडे केले आणि हे तुकडे वेगवेगळ्या जागी फेकले. आता अमर उजालाने दिलेल्या वृत्तानुसार, आफताबने पोलिसांना हे तुकडे शोधण्याचं आव्हान दिलं आहे. आपण या मृतदेहाच्या तुकड्यांची योग्य पद्धतीनं विल्हेवाट लावली, याबद्दल आफताबला विश्वास आहे. मी श्रद्धाचा खून केला. तिच्या मृतदेहाचे तुकडे आणि खुनासाठी वापरलेलं हत्यार तुम्ही शोधून दाखवाच, असं आव्हान आता आफताबने पोलिसांना दिलं आहे.