…….. म्हणून PM मोदींनी का टाकली एकनाथ शिंदेंच्या पाठीवर कौतुकाची थाप ? राऊतांचा खळबळजनक दावा

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . १२ डिसेंबर । नागपूर ते मुंबईला जोडणाऱ्या समृद्धी महामार्गाचे उद्घाटन काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले. या उद्घाटन कार्यक्रमावर बोलत असताना शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी नवी दिल्ली येथे पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे. ‘आम्हाला असं वाटलं होतं की, महाराष्ट्राचा अपमान करणारी व्यक्ती या व्यासपीठावर असताना मी आणि तुम्ही इथे कसे बसू शकतो? असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पंतप्रधानांना म्हणतील. मात्र पंतप्रधानांनी तर मुख्यमंत्र्यांच्या पाठीवर थाप मारली. ही थाप यासाठीच मारली असेल की पंतप्रधान म्हणाले असतील, शाब्बास! बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना तुम्ही फोडली,’ असा हल्लाबोल राऊत यांनी केला आहे.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि भाजपच्या विविध नेत्यांकडून महापुरुषांच्या होणाऱ्या अवमानावरूनही संजय राऊत यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. ‘बाळासाहेब ठाकरे यांचं नाव समृद्धी महामार्गाला देताना आपले मुख्यमंत्री भावुक झाले होते. मात्र हे सर्व ढोंग आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल तिथे बाळासाहेबांच्या नावाचा उल्लेख केला. मात्र तिथे कोणीही बाळासाहेब ठाकरे यांचा सन्मान आणि प्रतिष्ठा राहील, असं वर्तन कोणी केलं नाही. या महामार्गाच्या उद्घटनावेळी जी छायाचित्रे लावली होती, त्यात चौथ्या क्रमांकावर बाळासाहेब होते. पंतप्रधानांनी काल भाषण केलं आणि सांगितलं की आम्ही महाराष्ट्राला विकासाचे ११ तारे देत आहोत. मात्र या ११ पैकी पहिले जे दोन तारे आहेत, ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि बाळासाहेब ठाकरे यांचा अवमान तिथे झाला. छत्रपती शिवराय तर तारा नाही, प्रखर सूर्यच आहे. त्या सूर्यावर थुंकण्याचा प्रयत्न करणारे काल व्यासपीठावर होते,’ असं राऊत यांनी म्हटलं आहे.

‘बाळासाहेब ठाकरे आणि महाराष्ट्राची पुण्याई वाया जाणार नाही’

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या दोन्ही गटांची आज निवडणूक आयोगासमोर सुनावणी होणार आहे. याबाबत बोलताना संजय राऊत म्हणाले की, ‘शिवसेना आणि शिंदे गटाची निवडणूक आयोगात सुनावणी सुरू आहे. कोणत्या तरी एकाच बाजूने निर्णय देण्यासाठी निवडणूक आयोगावर दबाव असेल, मात्र आमचा सुप्रीम कोर्टावर विश्वास आहे. बाळासाहेब ठाकरे आणि महाराष्ट्राची पुण्याई वाया जाणार नाही. महाराष्ट्राची साडेअकरा कोटी जनता डोळ्यांत प्राण आणून या निर्णयाची वाट पाहात आहे. धनुष्याबाण हे चिन्ह आणि शिवसेना हे नाव उद्धव ठाकरे यांच्याकडेच राहील. बाकी गट वगैरे काही आहेत, त्यांच्याविषयी राज्यातील जनता आणि न्यायालयही निर्णय घेईल.’

चंद्रकांत पाटलांवरील शाईफेकीवर काय म्हणाले राऊत?

‘चंद्रकांतदादा पाटील हे ज्येष्ठ नेते आहेत, मंत्रीही आहेत. त्यामुळे त्यांच्यावरील हल्ल्याचं समर्थन कोणीही करणार नाही. मात्र अशा प्रकारचे हल्ले याआधीही झाले आहेत. आमच्यावरही हल्ले झाले आहेत, सामनावर मोर्चे आले आहेत. तेव्हा हे लोकं टाळ्या वाजवत होते. पत्रकारांवर कारवाई करून काहीच होणार नाही. पत्रकार त्यांचं काम करत असतात, लिहीत असतात, बोलत असतात. आंदोलक जे असतात त्यांच्या भावनांचा उद्रेक होत असतो, हा उद्रेक का झाला, याचा विचार केला पाहिजे,’ असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *