उद्धव ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांना ईडीचा धक्का

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । ४ जानेवारी । सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) राज्याचे माजी मंत्री आणि शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांच्या १०.२० कोटी रुपयांची मालमत्तेवर तात्पुरती जप्ती आणली आहे. जप्त करण्यात आलेल्या मालमत्तेमध्ये रत्नागिरीतील ४२ गुंठे जमीन व त्यावर बांधण्यात आलेल्या साई रिसॉर्टचा समावेश असून, त्याची किमत ७ कोटी ४६ लाख ४७ हजार असल्याचे समजते.

पर्यावरण वन आणि हवामान बदल मंत्रालयाने अनिल दत्तात्रय परब, मेसर्स साई रिसॉर्ट, मेसर्स सी शंख रिसॉर्ट आणि इतरांविरुद्ध दापोलीतील न्यायदंडाधिकाऱ्यांकडे दाखल केलेल्या तक्रारीच्या आधारे ईडीने आर्थिक गैरव्यवहार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत (पीएमएलए) तपास सुरू केला आहे. पर्यावरण (संरक्षण) कायदा, १९८६ च्या कलमांचे उल्लंघन झाल्याने अनिल परब आणि इतरांविरुद्ध राज्य सरकारची फसवणूक आणि नुकसान केल्याबद्दल दापोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत ईडीने सविस्तर परिपत्रकही जाहीर केले आहे.

काय म्हटले आहे ईडीच्या प्रेस नोटमध्ये?

ईडीने यासंदर्भात जाहीर केलेल्या परिपत्रकात म्हटले आहे की, अनिल परब यांनी साई रिसॉर्टशी संबंधित परवानग्या मिळवताना स्वतःची मालक म्हणून ओळख लपवली. विभास साठे नावाच्या व्यक्तीच्या नावाने सर्व परवानग्या अनिल परब यांनी मिळवल्या, असे या प्रेस नोटमध्ये सांगण्यात आले आहे. तसेच ग्रामपंचायत आणि महाराष्ट्र सरकारची फसवणूक करून परवानग्या मिळवल्या गेल्या. त्यामुळेच ईडीने मुरुड दापोली मधली ४२ गुंठे जमीन आणि साई रिसॉर्टची मालमत्ता जप्त केल्याचे सांगण्यात येत आहे. या जमिनीची किंमत २ कोटी ७३ लाख ९१ हजार रुपये असून अलिबाग येथे बांधण्यात आलेल्या साई रिसॉर्ट एनएक्सची किंमत ७ कोटी ४६ लाख ४७ हजार रुपये आहे, अशी माहिती ईडीकडून देण्यात आली.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *