औरंगजेबाचे गुजरात कनेक्शन, त्यामुळेच बावनकुळेंकडून औरंगजेबजी असा उल्लेख

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । ८ जानेवारी । भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी औरंगजेबाचा उल्लेख औरंगजेबजी केला. तो उगाच केलेला नाही. त्याला कारणे आहेत. औरंगजेबजी यांचा जन्म गुजरातच्या दाहोद येथे झाला. जन्मावेळी औरंगजेबाचे पिताश्री गुजरातचे सुभेदार होते. औरंगजेबाच्या या गुजरात कनेक्शनमुळेच बावनकुळे यांनी औरंगजेबजी केला असावा, असा चिमटा संजय राऊत यांनी काढला आहे.

नारायण राणेंना टोला

आज पत्रकार परिषदेत संजय राऊत म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांबाबत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी अवमानजनक वक्तव्य केले. तरीही भाजप नेते याबाबत अवाक्षरही काढत नाही. एखाद्या स्वाभिमानी नेत्याने तर आतापर्यंत आपल्या केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा दिला असता, असो टोलाही संजय राऊतांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे नाव न घेता लगावला.

बावनकुळेंना म्हणायचे काय?

याशिवाय सामनातील रोखठोक सदरात संजय राऊत यांनी म्हटले आहे की, संभाजीराजांचा अपमान अजित पवारांनी केला असा भाजपचा दावा. ‘संभाजीराजे हे स्वराज्य रक्षकच, धर्मवीर नाहीत’ या पवारांच्या विधानावर आता भाजपने वाद केला; पण संभाजीराजे धर्मवीर म्हणून मान्य पावले ते औरंगजेबाने त्यांच्यावर केलेल्या निर्घृण अत्याचारामुळे. त्या औरंगजेबाचा अत्यंत आदरपूर्वक ‘‘मा. औरंगजेबजी’’ असा उल्लेख चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला. याच ‘औरंगजेबजी’ यांनी धर्मवीर संभाजीराजांना अटक केली, त्यांची धिंड काढली, त्यांना विदूषकी पोशाख घातला, त्यांची निर्घृण हत्या केली. त्यांचे डोळेही फोडले, पण संभाजीराजेंनी धर्माभिमान व स्वाभिमान सोडला नाही. हे सर्व ज्या क्रूरकर्मा औरंगजेबामुळे घडले ते ‘औरंगजेबजी’ काय साधी असामी होती? असेच भाजपच्या बावनकुळेंना म्हणायचे आहे”

निवडणूक आयोगावर विश्वास

शिवसेना कोणाची? यावरून सध्या ठाकरे व शिंदे गटात वाद सुरू आहे. यावरही संजय राऊतांनी भाष्य केले. संजय राऊत म्हणाले, निवडणूक आयोगावर आमचा विश्वास आहे. निवडणूक आयोगाकडे आम्हाला नक्की न्याय मिळेल. निवडणूक आयोगाने खरे तर निपक्षपातीपणे काम करायला हवे. मात्र, आतापर्यंत आम्हाला निवडणूक आयोगाची ही स्वायत्तता व स्वातंत्र्य दिसली नाही. देशात अजून न्याय आणि कायदा जिवंत आहे. त्यामुळे आम्हाला नक्की न्याय मिळेल.

केंद्राच्या दबावातून राज्यात घटनाबाह्य सरकार चालवले जात आहे. मात्र, हे सरकार नक्की पडेल. सर्वोच्च न्यायालयात अजूनही रामशास्त्री बाण्याचे न्यायमूर्ती आहेत. त्यामुळे आम्हाला न्याय मिळेल, असे संजय राऊत म्हणाले. पुढे संजय राऊत म्हणाले, राज्यात शिवसेना केवळ एकच आहे. बाळासाहेब ठाकरेंनी या शिवसेनेची स्थापना केली आहे व सध्या उद्धव ठाकरे हा पक्ष चालवत आहेत. शिंदे गटाचा पराभव होईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *