महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । ९ जानेवारी । तमाम कुस्तीशौकिनांसाठी पर्वणी असलेल्या मानाच्या 65व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेची घमासान मंगळवारपासून (दि. 10) कोथरूड येथील कुस्तीमहर्षी स्वर्गीय मामासाहेब मोहोळ क्रीडा नगरीत रंगणार आहे. 14 जानेवारीपर्यंत चालणाऱया या स्पर्धेत 34 जिल्हे आणि 11 महानगरपालिका अशा एकूण 45 संघांतील 900हून अधिक मल्ल कैशल्य पणाला लावणार आहेत. सर्व शहर व जिल्हा संघांतील मल्लांचे थवे छातीचे तवे पुढे काढून रुबाबात क्रीडा नगरीत दाखल होतील तेव्हा अवघे वातावरण कुस्तीमय झालेले असेल.
‘महाराष्ट्र केसरी’ स्पर्धेच्या तयारीचा आढावा व मैदानाची पाहणी केल्यानंतर स्पर्धेचे मुख्य संयोजक माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांनी रविवारी पत्रकारांशी संवाद साधला. या वेळी पुणे जिल्हा कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष पै. संदीप भोंडवे, पुणे राष्ट्रीय तालीम संघाचे अध्यक्ष पै. योगेश दोडके, चिंचवड कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष पै. हनुमंत गावडे, पुणे शहर राष्ट्रीय तालीम संघाचे विश्वस्त पै. तात्यासाहेब भिंताडे, पुणे जिल्हा कुस्तीगीर संघाचे कार्याध्यक्ष विलास कथुरे यांच्यासह संयोजन समितीचे व विविध संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते. पालकमंत्री चंद्रकांत पाटील, भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, ऑलिम्पिक पदक विजेता कुस्तीगीर योगेश्वर दत्त यांच्या हस्ते मंगळवारी (दि. 10) सायंकाळी 6 वाजता स्पर्धेचे उद्घाटन होणार आहे.
राष्ट्रीय कुस्ती महासंघाने महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या अस्थायी समितीमार्फत ही स्पर्धा अधिकृतपणे घेण्याची जबाबदारी संस्कृती प्रतिष्ठानवर सोपवली आहे. राज्यातील 45 तालीम संघांचे कुस्तीगीर, पदाधिकारी आमच्यासोबत आहेत. असे असतानाही खोडसाळपणे पत्रक काढून विरोधकांकडून दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला जात आहे, असे स्पर्धा संयोजक मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले.
‘कोथरूड येथे 10 ते 14 जानेवारीदरम्यान महाराष्ट्र केसरी या नावाने कुस्ती स्पर्धा होत आहे. महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेकडून स्पर्धा आयोजकांना नियम व अटी-शर्तीसह पत्र देण्यात आले होते. मात्र आयोजकांनी राज्य कुस्तीगीर परिषदेस या पत्राचे उत्तर दिलेले नाही. तसेच कुस्तीगीर परिषदेच्या नियम व अटी-शर्ती मान्य केलेल्या नाहीत. त्यामुळे ‘महाराष्ट्र केसरी’ नावाने होत असलेल्या या स्पर्धेत महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेकडून कोणत्याही प्रकारे मान्यता देण्यात आलेली नाही, महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेतर्फे होणारी अधिकृत महाराष्ट्र केसरी स्पर्धा पत्रकार परिषद घेऊन कळविण्यात येईल, अशी माहिती महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे सरचिटणीस बाळासाहेब लांडगे यांनी पत्रकाद्वारे दिली. त्यामुळे या स्पर्धेच्या अधिकृततेबद्दलचे प्रश्नचिन्ह कायम आहे.
कुस्तीपटूंवर होणार बक्षिसांचा वर्षाव
‘महाराष्ट्र केसरी’च्या विजेत्याला महिंद्रा थार जीप व रोख पाच लाखांचे बक्षीस, तर उपविजेत्याला ट्रक्टर व रोख अडीच लाखांचे बक्षीस मिळणार आहे. याचबरोबर विविध 9 वजनी गटातील गादी विभाग व माती विभाग मिळून एकूण 18 वजनी गटातील विजेत्या मल्लाला ‘येझदी जावा’ ही मोटरसायकल व रोख बक्षीस दिले जाणार आहे. उपविजेत्यांनाही बक्षिसे दिली जाणार आहेत.