![]()
महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । ९ जानेवारी । आपत्कालीन परस्थितीत तत्काळ रेल्वे गाडी थांबवण्यासाठी असलेल्या साखळीनेच मध्य रेल्वेला ब्रेक लावल्याचे समोर आले आहे. वर्षभरात मध्य रेल्वेवर 9 हजार 49 वेळा मोटारमनचे लक्ष वेधण्यासाठी साखळी खेचण्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामध्ये केवळ 874 घटनांमागे योग्य कारण होते, तर उर्वरित तब्बल 8 हजार 176 घटनांमागे कोणतेही योग्य कारण नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे रेल्वेच्या हजारो गाडय़ांना लेटमार्क मिळाला आहे.
मध्य रेल्वे मार्गावर उपनगरीय लोकल सेवेबरोबरच एक्सप्रेस, राजधानी, पॅसेंजर अशा विविध गाडय़ा धावतात. रेल्वे प्रवासामध्ये कोणताही अनुचित प्रकार घडल्यास किंवा आपत्कालीन परिस्थितीमध्ये त्याची कल्पना मोटारमन किंवा लोको पायलटला देता यावी, गाडी थांबवता यावी म्हणून प्रत्येक डब्यात आपत्कालीन साखळी उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्याचा योग्य कारणाशिवाय वापर केल्यास संबंधितावर दंडात्मक आणि एक वर्षाच्या कारावासाच्या शिक्षेची तरतूद आहे. तरीही अनेकदा हुल्लडबाजांकडून साखळी खेचण्याचे प्रकार घडतात. त्यामुळे गाडी थांबवावी लागत असल्याने त्याचा रेल्वेच्या वेळापत्रकावर परिणाम होतो. त्याची दखल घेत मध्य रेल्वेने निष्कारण साखळी ओढणाऱयांचा शोध घेत त्यांच्याकडून तब्बल 55 लाख 86 हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे. तसेच प्रवाशांनी योग्य कारणाशिवाय आपत्कालीन साखळी ओढू नये असे आवाहन रेल्वेने केले आहे.