महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । ९ जानेवारी । चार महिन्यांपूर्वी राज्यात सत्तांतर झाले. एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून उठाव केल्यानं महाविकास आघाडी सरकार अल्पमतात आलं आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पदाचा राजीनामा द्यावा लागला. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी भाजपच्या मदतीनं मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शपथ घेतल्यापासून आरोप, प्रत्यारोपाला उधाण आलं आहे. ठाकरे गटाकडून सत्ताधाऱ्यांवर अनेक गंभीर आरोप केले जात आहेत. तर दुसरीकडे सत्ताधाऱ्यांकडून देखील विरोधकांच्या आरोपांना तोडीस तोड उत्तर दिलं जात आहे. सत्ता स्थापनेपासून माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे एका व्यासपीठावर कधीच दिसले नाहीत. मात्र आता ते लवकरच एकत्र एका व्यासपीठावर दिसणार आहेत. विशेष म्हणजे त्यांच्यासोबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील असणार आहेत.
विधानभवनातील मध्यवर्ती सभागृहात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या तैलचित्राचे अनावरण करण्यात येणार आहे. येत्या 23 तारखेला तैलचित्राचे अनावरण करण्यात येणार आहे. या कार्यक्रमासाठी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना देखील निमंत्रण देण्यात आलं आहे. उद्ध ठाकरे हे या कार्यक्रमाला उपस्थित राहाणार की नाही याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. मात्र बाळासाहेबांच्या तैलचित्राचे अनावरण असल्यानं उद्धव ठाकरे हे या कार्यक्रमाला उपस्थित राहणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. या निमित्तानं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे एकाच व्यासपीठावरक दिसणार आहे.
दरम्यान या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबतच विविध क्षेत्रातील प्रमुख मान्यवरांची उपस्थिती असणार आहे. या कार्यक्रमाचं निमंत्रण अभिनेते अमिताभ बच्चन आणि सुप्रसिद्ध गायिका आशा भोसले यांना देखील देण्यात आले आहे.