“अशोक सराफ यांना ‘विनोदी’ अभिनेता म्हणणंच चुकीचं…” राज ठाकरेंनी व्यक्त केली खंत

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । ९ जानेवारी । ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांच्या पंच्याहत्तरी निमित्त पुण्यात अशोकपर्व कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अशोक सराफ यांचं भरभरुन कौतुक केलं. यावेळी राज ठाकरे यांनी व्यासपीठावरुन भाषण करताना अनेक खंत व्यक्त केल्या. “आपल्याकडे मोठी माणसं उरलेली नाहीत, म्हणून आमच्यासारख्या माणसांच्या हस्ते तुमचा सत्कार उरकावा लागतोय, हे दुर्दैव आहे”, असे राज ठाकरे म्हणाले.

पुण्यात ‘अशोक पर्व’ या कार्यक्रमाचं आयोजन आलं होतं. या निमित्ताने ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांचा राज ठाकरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी अशोक सराफ यांनी पुण्यातील सर्व रसिक प्रेक्षकांचे मनापासून आभार मानले. त्यावेळी राज ठाकरेंनी अशोक सराफ यांचे कौतुक केले.

राज ठाकरे काय म्हणाले?

“अशोक सराफ हे बोलत असताना मला क्षणभर वाटलं की माझी पंच्याहत्तरी झाली आहे. खरंतर तुम्ही तुमच्याबद्दल बोलायचं होतं, पण ते माझ्याबद्दलच बोलत राहिले. ज्या व्यक्तीला लहान असल्यापासून आजपर्यंत आपण पाहत आलो, त्या व्यक्तीने हा माझा आवडता हे सांगणं हे पण भरुन पावतं. मी त्यांचे कितीतरी चित्रपट पाहिलेत, नाटक बघितलेत. मला त्यांचं ‘डार्लिंग डार्लिंग’ हे नाटक अजूनही आठवतंय. समोर कोणीही कलाकार असू दे, अशोक सराफ यांना काहीही फरक पडला नाही. कोणत्याही चित्रपटात, नाटकांमध्ये त्यांनी स्वत: प्रभाव कायम ठेवला. ही साधी गोष्ट नाही. मी त्यादिवशी त्यांच ‘व्हॅक्यूम क्लिनर’ नाटक पाहिलं. त्यांच्या एण्ट्रीला सर्व ऑडिटोरिअममध्ये टाळ्यांचा कडकडाट पाहायला मिळाला. ५०-६० वर्ष स्वत:बद्दल कुतहूल जागृक ठेवणं ही साधीसुधी गोष्ट नाही.

त्यांनी किती साली पहिलं नाटक केलं असेल याबद्दल मला कल्पना नाही. पण आज इतक्या वर्षांनी अशोक सराफ हे नाव घेतल्यानंतर सभागृहाचा कोपरानकोपरा भरला जातो, ही काय साधीसुधी गोष्ट आहे का? खरंतर त्यांना फक्त अभिनेता म्हटलं पाहिजे. त्यांना विनोदी अभिनेता म्हणणंच चुकीचं आहे. अशोक सराफ यांनी इतकी वर्ष नाटक, चित्रपट आणि मालिका या सर्व माध्यमांवर ते झळकले. आता फक्त ओटीटी प्लॅटफॉर्म राहिला आहे.

पण इतकी वर्ष एक कलावंत काम करतोय, आज अशोक सराफ ही व्यक्ती दक्षिणेत असते तर ते मुख्यमंत्री असते. त्यांचा ४०-४० कटआऊट लावून त्यावर दूधाने अभिषेक करण्यात आला असता. पण इथे महाराष्ट्रात चांगले कलावंत आहेत, असं सांगत आटपलं जातं. कलाकाराचं महत्त्व परदेशात गेल्याशिवाय कळत नाही. तिथे कलावंतांच्या नावाने विमानतळं असतात.

अशोक सराफ यांचा मी नेहमीच आदर केला आहे. तुमचं मूळ घराणं हे बेळगावचं आणि जन्म मुंबईचा, मला तर वाटतं की तुम्हीच सीमाप्रश्न सोडवला. मला माहिती नव्हते. इतकी वर्षे लोकांना भूरळ घालणे, सतत नवनवीन प्रयोग करणे ही काही सोपी साधी गोष्ट नाही. जर हेच तुम्ही युरोपमध्ये असता तर आज या मंचावर तुमचा सत्कार करण्यासाठी पंतप्रधान असता.

कलावंत, दिग्दर्शक, कवी, चित्रकार, संगीतकार, गायक हे जर आज नसते तर काय झालं असतं? जर ते नसते तर अराजक आले असते. त्यांचे या देशावर खरंच उपकार आहेत. तुमच्यामुळे हा देश चुकीच्या मार्गाला गेला नाही. अशी माणसं पुन्हा होणे नाही. हा दागिना सराफांच्या घरीच मिळू शकतो. आई जगदंबे चरणी मी तुम्हाला उदंड आयुष्य तुम्हाला मिळो आणि आम्हाला सतत त्यांच्याकडून नवनवीन गोष्टी पाहायला मिळो, हीच मी प्रार्थना करतो, असे राज ठाकरे म्हणाले.

दरम्यान अशोक सराफ यांच्या सत्कारानंतर अशोक सराफ यांनी देखील राज ठाकरे आभार मानले. त्यावेळी त्यांनी राज ठाकरेंचे कौतुक केले. तसेच त्यांनी प्रेक्षकांचेही आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *