महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । १२ जानेवारी । निवडणूक आयोगात शिंदे विरुद्ध ठाकरे गटाची घमासान लढाई सुरू आहे. उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुखपदावरच शिंदे गटाने प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. दुसरीकडे, याच पदाचा उद्धव ठाकरेंचा कार्यकाळ २३ जानेवारीला संपत आहे. ठाकरे गटाने त्यामुळे फेरनिवडीसाठी निवडणूक आयोगाकडे विनंती केली आहे.
एक तर पक्षांतर्गत निवडणुकांना परवानगी द्या, नाही तर अंतिम निर्णयापर्यंत या पदासाठीची मुदतवाढ द्या, अशी मागणी ठाकरे गटाने आयोगाला केल्याचे खासदार अनिल देसाई यांनी सांगितले. शिवसेनेतील पक्षप्रमुख हे पद पक्षाच्या घटनेशी सुसंगत नाही, त्यामुळे बेकायदेशीर आहे असा दावा शिंदे गटाचा आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर पक्षप्रमुखपद निर्माण केले असून जुन्या घटनेत बदल न करताच झाले, असा आरोप शिंदे गटाचा आहे.