महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी ।२२ जानेवारी । उस्मानाबादहून मुंबईला दोन टन गोमांस घेऊन जाणारा टेम्पो खडकी पोलिसांनी पकडला. जुन्या मुंबई-पुणे रस्त्यावर खडकी जकात नाका भागात ही कारवाई करण्यात आली. या प्रकरणी तिघांना अटक करण्यात आली.
सय्यद सोहेब अजीज (वय ३७, रा. वाशी, नवी मुंबई), तन्वीर अहमद कुरेशी (वय ४२, रा. वाशी, नवी मुंबई), शौकत हमीद कुरेशी (वय ३५, रा. उस्मानाबाद) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याबाबत २७ वर्षीय तरुणाने फिर्याद दिली आहे. या प्रकरणी खडकी पोलीस ठाण्यात महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
उस्मानाबाद येथून एका टेम्पोत दोन टन गोमांस घेऊन काहीजण मुंबईकडे निघाल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. खडकी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विष्णू ताम्हाणे यांनी त्वरित कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. पोलिसांच्या पथकाने जुन्या मुंबई-पुणे रस्त्यावर सापळा लावला. खडकी जकात नाका परिसरात संशयित टेम्पो पोलिसांच्या पथकाने अडवला. पोलिसांनी टेम्पोची पाहणी केली. तेव्हा टेम्पोत गोमांस आढळून आले. पोलिसांनी आरोपींसह टेम्पो ताब्यात घेतला. टेम्पोतील सय्यद अजीज आणि तन्वीर कुरेशी यांच्याकडे केलेल्या चौकशीत ते गोमांस घेवून मुंबईला जात असल्याचे उघडकीस आले. पोलिसांनी तिघांना अटक केली.
खडकी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विष्णू ताम्हाणे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक शारदा वालकोळी, पोलीस उपनिरीक्षक वैभव मगदुम, संतोष भांडवलकर, पोलीस नाईक उद्धव कलंदर, सागर जाधव, शिवराज खेड आदींनी ही कारवाई केली.