‘छत्रपती संभाजी महाराज यांची ओळख धर्मवीरच’; आमदार शिवेंद्र राजे भोसले

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी ।२२ जानेवारी । धर्मांतर, गोहत्या आणि लव जिहाद यासाठी कडक कायदे करावेत. त्याची कठोर अंमलबजावणी करण्यात यावी. तसेच धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचा बलिदान दिवस धर्मवीर दिन म्हणून साजरा करावा. या मागणीसाठी पुण्यात सकल हिंदू समाजाच्यावतीने हिंदू जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला आहे. या मोर्चाला लाल महाल येथून सुरवात झाली आहे. हा मोर्चा डेक्कन येथील छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्यापर्यंत असणार आहे.

या मोर्चात सहभागी झालेले भाजपाचे आमदार शिवेंद्र राजे भोसले म्हणाले की, हिंदू समाजाला जे भीतीचे वातावरण झाले आहे. त्या भीतीला वाचा फोडण्यासाठी आज हा मोर्चा काढण्यात आला आहे. प्रत्येक शहरात तालुक्यात असे मोर्चे काढले जात आहे. केंद्रात आणि राज्यात दोन्ही ठिकाणी आमच्याच विचारांच सरकार असल्याने सरकार निश्चित दखल घेईल. तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्याची स्थापना केली.त्यामध्ये धर्माचे रक्षण करणे हा देखील भाग होता. त्याचबरोबर आम्ही कोणाच्याही विरोधात नाही. आम्ही धर्म रक्षणच कार्य करीत आहोत.आत्तापर्यंत आपण जो इतिहास वाचला. त्यामध्ये छत्रपती संभाजी महाराज यांची ओळख धर्मवीर म्हणूनच आहे. त्यामुळे कोणी काही म्हणू द्या, छत्रपती संभाजी महाराज यांची ओळख धर्मवीरच आहे आणि कायम राहणार असल्याची भूमिका त्यांनी यावेळी मांडली.

या मोर्चात आमदार भीमराव तापकीर,तेलंगणाचे आमदार राजा भैया ठाकूर, तुकाराम महाराजांचे वंशज शिवाजीराव मोरे, मिलिंद एकबोटे, धनंजय देसाई,निवृत्त पोलीस अधिकारी भानू प्रताप बर्गे हे सहभागी झाले आहेत. लाल महाल येथून ११ वाजण्याच्या सुमारास मोर्चाला सुरवात झाली. त्यानंतर श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची महाआरती करण्यात आल्यानंतर लक्ष्मी रोडने हा मोर्चा डेक्कन परिसरातील धर्मवीर संभाजी महाराजांच्या स्मारकाच्या दिशेने मोर्चा मार्गस्थ झाला आहे. शहरातील विविध राजकीय पक्ष, हिंदुत्ववादी संघटना, व्यापारी, गणेशोत्सव मंडळे या मोर्चात सहभागी झाले आहेत.

होय मी धर्मवीरच !, गो हत्या मुक्त पुणे, फाल्गुन अमावस्या अर्थात धर्मवीर दिन,लव जिहाद मुक्त पुणे असे फलक घेऊन विविध हिंदुत्ववादी संघटनेचे कार्यकर्ते मोर्चात सहभागी झाले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *