![]()
✍️ महाराष्ट्र २४ | विशेष प्रतिनिधी | दिनांक १४ डिसेंबर २०२५ | भारतामध्ये आता ४ दिवसांचा कामाचा आठवडा आणि ३ दिवसांची सशुल्क सुट्टी मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. श्रम आणि रोजगार मंत्रालयाच्या नवीन कामगार कायद्यांमुळे कंपन्यांना लवचिक वेळापत्रक राबवण्याची मुभा देण्यात आली आहे. त्यामुळे कामाचा ताण कमी होऊन कर्मचाऱ्यांना अधिक विश्रांती मिळू शकते.
मंत्रालयाने स्पष्ट केलं आहे की, आठवड्यातील कमाल कामाचे तास ४८ इतकेच राहतील. जर एखादी कंपनी दिवसाला १२ तासांची शिफ्ट ठेवत असेल, तर कर्मचारी आठवड्यात फक्त ४ दिवस काम करून उर्वरित ३ दिवस सुट्टी घेऊ शकतो. म्हणजेच कामाचे तास तेवढेच राहतील, पण दिवसांची रचना बदलू शकते.
१२ तासांच्या शिफ्टमध्ये विश्रांतीचा (ब्रेक) कालावधीही समाविष्ट असेल, असं मंत्रालयाने स्पष्ट केलं आहे. तसेच, आठवड्यात ४८ तासांपेक्षा अधिक काम झाल्यास ओव्हरटाईमसाठी दुप्पट मोबदला देणे कंपन्यांना बंधनकारक राहणार आहे.
२१ नोव्हेंबर २०२५ रोजी केंद्र सरकारने २९ जुने कामगार कायदे रद्द करून चार नवीन कामगार संहिता लागू केल्या आहेत. या कायद्यांमुळे कंपन्यांना ४ दिवसीय कामाचा आठवडा लागू करण्याची कायदेशीर मुभा मिळाली आहे, मात्र तो निर्णय पूर्णपणे कंपन्यांवर अवलंबून असणार आहे.
