✍️ महाराष्ट्र २४ | विशेष प्रतिनिधी | दिनांक १४ डिसेंबर २०२५ | मुंबई–पुणे प्रवास करणाऱ्यांसाठी मोठी दिलासादायक बातमी आहे. सध्या अडीच ते तीन तास लागणारा हा प्रवास, ट्रॅफिकमुळे कधी चार-पाच तासांपर्यंत वाढतो. मात्र केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी जाहीर केलेल्या नव्या मास्टरप्लॅनमुळे लवकरच मुंबई ते पुणे अंतर केवळ ९० मिनिटांत पार करता येणार आहे.
गडकरींनी सांगितले की, अटल सेतू–जेएनपीटी–पुणे-शिवार जंक्शन असा सुमारे १३० किमीचा ग्रीनफिल्ड लिंक एक्सप्रेस हायवे उभारण्यात येणार आहे. हा मार्ग पुणे–मुंबई एक्सप्रेस हायवेला जोडला जाणार असून, त्यामुळे वेगवान आणि थेट प्रवास शक्य होईल.
फक्त पुणे जिल्ह्यासाठीच सुमारे ५० हजार कोटी रुपयांची विकासकामे मंजूर करण्यात आली आहेत. त्यामध्ये तळेगाव–चाकण–शिक्रापूर चार स्तरांचा एलिव्हेटेड मार्ग, तसेच हडपसर–यवत एलिव्हेटेड महामार्ग यांसारख्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांचा समावेश आहे. अनेक प्रकल्पांच्या निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्या आहेत.
निवडणुका संपल्यानंतर या प्रकल्पांचे भूमिपूजन होणार असून, पुढील वर्षभरात महाराष्ट्रात दीड लाख कोटींची पायाभूत कामे केली जाणार आहेत. यामुळे मुंबई–पुणेच नव्हे तर संपूर्ण राज्यातील प्रवास अधिक जलद, सुरक्षित आणि सुलभ होणार आहे.
