✍️ महाराष्ट्र २४ | विशेष प्रतिनिधी | दिनांक १४ डिसेंबर २०२५ | हिंदुस्थान–पाकिस्तान फाळणीनंतर पहिल्यांदाच पाकिस्तानात संस्कृत भाषेचा अभ्यासक्रम सुरू करण्यात आला आहे. लाहोर विद्यापीठात तीन महिन्यांचा संस्कृत कोर्स सुरू झाला असून, त्यामध्ये विद्यार्थ्यांना महाभारत आणि भगवद्गीतेचाही अभ्यास करायला मिळणार आहे.
लाहोर विद्यापीठातील प्राध्यापक डॉ. अली उस्मान कासमी यांनी दिलेल्या माहितीनुसार, या उपक्रमाला विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. पुढील १० ते १५ वर्षांत पाकिस्तानात संस्कृतचे अभ्यासक आणि विद्वान तयार होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
या अभ्यासक्रमाच्या सुरुवातीसाठी प्रा. डॉ. शाहिद राशिद यांचे मोलाचे योगदान आहे. संस्कृत ही केवळ हिंदू धर्मापुरती मर्यादित भाषा नसून, सिंधू संस्कृतीच्या काळात पाकिस्तानच्या भूभागात मोठ्या प्रमाणावर संस्कृत लेखन झाले, असे त्यांनी स्पष्ट केले.
तसेच, संस्कृतचे महान व्याकरणकार पाणिनी यांचा जन्म आजच्या पाकिस्तानातील भूभागात झाला होता, याकडे लक्ष वेधत संस्कृत भाषा अभ्यासक्रमासाठी निवडण्यामागील ऐतिहासिक आणि सांस्कृतिक कारणे राशिद यांनी मांडली.
