कसबा, चिंचवड पोटनिवडणुकांसाठी १७२० ईव्हीएम दाखल

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । २४ जानेवारी । कसबा पेठ आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक जाहीर झाली असून २७ फेब्रुवारीला मतदान होणार आहे. या निवडणुकीची जिल्हा प्रशासनाकडून पूर्व तयारी सुरू आहे. मतदानासाठी जिल्हा प्रशासनाला १७२० मतदान यंत्रे (इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशिन – ईव्हीएम) प्राप्त झाली असून या यंत्रांच्या प्राथमिक तपासणीचे काम सुरू करण्यात आले आहे.

कसबा पेठ विधानसभा मतदारसंघाच्या आमदार मुक्ता टिळक आणि चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या दोन विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीचा कार्यक्रम केंद्रीय निवडणूक आयोगाने नुकताच जाहीर केला आहे. त्यानुसार ३१ जानेवारीपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात होणार आहे. २७ फेब्रुवारीला मतदान, तर मतमोजणी २ मार्च रोजी होणार आहे. या सर्व पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाकडून निवडणुकीची तयारी सुरू करण्यात आली आहे.

दरम्यान, कसबा पेठ विधानसभा मतदारसंघात २७० मतदान केंद्र, तर चिंचवड विधानसभा मतदारसंघात ५१० मतदान केंद्र आहेत. या मतदान केंद्रामध्ये ईव्हीएम मशिन (बॅलेट युनिट, कंट्रोल युनिट) आणि व्हीव्हीपॅट यंत्रे असणार आहे. या दोन्ही मतदारसंघांत मिळून एकूण ७८० मतदान केंद्रे असून एकूण १७२० ईव्हीएम यंत्रे जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाली असून या सर्व यंत्रांची पहिल्या टप्प्यात तांत्रिक तपासणी करण्याचे काम सुरू आहे. या तपासणीमध्ये यंत्रे व्यवस्थित चालू आहेत किंवा कसे, याची तपासणी करण्यात येत आहे. उमेदवार यादी अंतिम झाल्यानंतर पुन्हा एकदा सर्व राजकीय प्रतिनिधींसमवेत अशीच तपासणी केली जाणार असल्याची माहिती जिल्हा निवडणूक शाखेकडून देण्यात आली.

मतदारसंघाचे नाव एकूण मतदार मतदान केंद्रे
कसबा पेठ २,७५,४२८ २७०

चिंचवड ५,६६,४१५ ५१०

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *