महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . ३ फेब्रुवारी ।अमरावती पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीची कालपासून सुरू असलेली मतमोजणी अखेर संपली आहे. तब्बल 30 तासानंतर या निवडणुकीचा निकाल समोर आला आहे. या निवडणुकीत अखेर महाविकास आघाडीचे उमेदवार धीरज लिंगाडे विजयी झाले असून त्यांनी भाजपचे उमेदवार रणजीत पाटील यांचा मोठ्या फरकाने पराभव केला आहे. भाजपसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. भाजपसह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनाही हा मोठा धक्का असल्याचं मानलं जात आहे.
अमरावती पदवीधर मतदारसंघासाठी काल सकाळी 8 वाजता मतमोजणी सुरू झाली होती. सुरुवातीपासूनच धीरज लिंगाडे हे आघाडीवर होते. मात्र, संध्याकाळी भाजपचे उमेदवार रणजित पाटील यांनी अवैध बाद मतांवर आक्षेप घेत फेरमतमोजणीची मागणी केली होती. त्यानंतर ही फेरमतमोजणी सुरू झाली होती. तब्बल 30 तास ही फेर मतमोजणी झाली. त्यात लिंगाडे हे विजयी झाले. त्यांनी मोठ्या फरकाने रणजित पाटील यांना पराभूत केले.