महाराष्ट्र 24 – दि.10- प्रतिनिधी अजय विघे-
*पायाला फोड, त्यातून रक्त, वेदनेचा दाह; तरीही चेहऱ्यावर स्मित हास्य !*
- नाशिक: महाकारुणी तथागत गौतम बुद्धांच्या अस्थींसोबत चालणाऱ्या ‘भन्तेजींनी महाराष्ट्रात ४१० किलोमीटरचे अंतर पूर्ण करीत नाशिक गाठले. नाशिकमध्ये पोहोचेपर्यंत त्यातील अनेकांच्या पायाला फोड आले, तर कुणाच्या पायातून रक्त वाहत होते. पायाला बँडेज करूनही ओल्या जखमेच्या वेदनेचा दाह कायम होता, तरीही त्यांच्या चेहऱ्यावर स्मित हास्य होते आणि मुखी गोड वाणी • थायलंड येथील ११० भिख्खू, आपल्या अनुयायांसह महाराष्ट्रातून बुद्ध अस्थी घेऊन पदयात्रा करीत आहेत. गेल्या १७ जानेवारीपासून परभणी येथून तथागत गौतम बुद्धांच्या पवित्र अस्थी घेऊन भिख्खू संघ मुंबईतील चैत्यभूमीच्या दिशेने निघाला आहे. आतापर्यंत त्यांनी ४१० किलोमीटरचा पायी प्रवास केला आहे, तर अजूनही १६० किलोमीटरचा प्रवास करून ते मुंबईत चैत्यभूमी येथे पोहोचणार आहेत. सोमवारी (दि. ६) नाशिकमध्ये त्रिरश्मी लेण्याच्या पायथ्याशी बुद्धस्मारकात भन्तेगणांनी मुक्काम केला तेव्हा ते स्वत: आपल्या पायाची शुश्रूषा करताना दिसले.
दररोज २० किलोमीटरचा पायी प्रवास करत नाशिकमध्ये पोहोचलेल्या भन्तेंजींच्या पायाला फोड आलेले दिसले. अनेकांच्या पायाची साल निघाली होती, तर कुणाचे तळपाय चिरलेले होते. काहींच्या जखमा अजूनही ओल्याच होत्या. अशाही परिस्थितीत त्यांच्या चेहऱ्यावर स्मित हास्य होते आणि मुखी आशीर्वचन मुक्कामाच्या ठिकाणी त्यांनी स्वतःच आपल्या पायाला मलमपट्टी केली, तर काही उपासक उपासिकांनी त्यांची
सेवा केली. निवांत पहुडलेल्या भन्तेजींच्या सेवेची इच्छा व्यक्त करीत उपासक उपासिकांनी जमेल तशी त्यांची शुश्रूषा केली. या यात्रेसोबत वैद्यकीय पथक असून, पदयात्रा मार्गावर अनेक डॉक्टरांनी स्वयंस्फूर्तीने सेवादेखील दिली.
भारत ही तर बुद्धांची भूमी आहे. येथे चप्पल घालून कसे चालणार. भारतात धम्मचक्र गतिमान करण्यासाठी आणि जगाला शांतता, अहिंसेचा संदेश देण्यासाठी आम्ही चालत आहोत. बुद्धांच्या भूमीत आल्याने जीवन सार्थक झाल्याचे समाधान आहे. या आनंदापुढे पायाचे दुखणे काहीच जाणवले नाही.
-भदन्त कोविंदाजी, थायलंड,
——————————————-
पदयात्रेत चालणाऱ्या भन्तेजींना कोणत्याही प्रकारच्या सुखसोयींची अपेक्षा नाही. त्यांना सुविधा देण्याचा प्रयत्न केला असता भारतात बुद्धभूमीत आल्याचे समाधान असल्याने भारावून गेल्याचे ते सांगतात. महाराष्ट्रातील उपासक, उपासिकांच्या प्रतिसादामुळेही ते आनंदीत आहेत. पायाला जखमा आहेत. त्यांची काळजी घेण्यासाठी’ वैद्यकीय पथकाची मदत घेतली जाते.
डॉ. सिद्धार्थ हत्तीअंबिरे, आयोजन समिती.