महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . १७ फेब्रुवारी । बीबीसीच्या दिल्ली आणि मुंबई ऑफिसवर होणारं आयकर विभागाचं सर्वेक्षण काल रात्री अखेर पूर्ण झालं. तीन दिवस सलग हे सर्वेक्षण सुरू होतं. या सर्वेक्षणानंतर आता बीबीसीने आपली भूमिका जाहीर केली असून आपण काम करत राहणार असल्याचं स्पष्ट केलं आहे.
बीबीसीच्या काही वरिष्ठ संपादकांसह जवळपास १० कर्मचारी दिल्लीतल्या कस्तुरबा गांधी मार्ग इथल्या कार्यालयातून तीन दिवसांनी घरी परतले आहेत. आयकर विभागाच्या कर्मचाऱ्यांनी बीबीसीच्या काही वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मोबाईल फोन्स, लॅपटॉप्स आणि कम्प्युटर्समधला सगळा डाटा आपल्याकडे घेतला आहे.
आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी टॅक्स, ब्लॅक मनी, बेनामी असेल कीवर्ड वापरून डिव्हाईसेसमधला डाटा सर्च केला आहे. आपली भूमिका मांडताना बीबीसीने म्हटलं आहे की, आयकर विभागाचे अधिकारी आमच्या दिल्ली आणि मुंबईमधल्या ऑफिसेसमधून आता गेले आहेत. आम्ही या अधिकाऱ्यांना पूर्ण सहकार्य करू. लवकरात लवकर हे प्रकरण मिटेल अशी आशा आहे.
Update on India: pic.twitter.com/rghvE6OpfQ
— BBC News Press Team (@BBCNewsPR) February 16, 2023
बीबीसीने पुढे म्हटलं आहे की, “आम्ही सध्या आमच्या कर्मचाऱ्यांच्या पाठीशी आहोत. काहींना दीर्घकाळ चौकशीला सामोरं जावं लागलं आहे, तर काही जणांना रात्रभर ऑफिसमध्येच थांबून राहावं लागलं आहे. त्यांचं सगळं ठीक व्हावं यालाच आमचं प्राधान्य आहे. आमचं काम पुन्हा सुरू झालं असून आम्ही पुन्हा भारत आणि जगातल्या प्रेक्षकांच्या सेवेसाठी आलो आहोत.”
“बीबीसी ही एक विश्वासार्ह आणि स्वतंत्र माध्यमसंस्था आहे. निष्पक्ष आणि निडरपणे काम करतच राहणाऱ्या सर्व कर्मचारी आणि पत्रकारांच्या सोबत आम्ही आहोत”, असंही बीबीसीने म्हटलं आहे.