महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . २० फेब्रुवारी । महाराष्ट्राचे माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा साडेतीन वर्षांचा कार्यकाळ वादग्रस्त असा राहिला. वेगवेगळ्या कारणांनी ते वादात अडकले होते. राज्यातील राजकीय घडामोडी ते महापुरुषांबाबत केलेल्या वक्तव्यांमुळे त्यांच्यावर विरोधकांनी प्रचंड टीका केली. आता राजीनामा दिल्यानतंर त्यांनी दिलेल्या एका मुलाखतीत अनेक मुद्द्यांवर उत्तरे दिली आहेत. यात राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत विचारलेल्या एक प्रश्नावर उत्तर देताना ते संत माणूस असल्याचं म्हटलंय.
राज्यात राजकीय उलथापालथ होत असताना विधानसभा अध्यक्षाच्या निवडीवरून बराच गोंधळ झाला होता. यावेळी उद्धव ठाकरे यांनी लिहिलेल्या पत्राच्या भाषेवर भगतसिंह कोश्यारी यांनी तेव्हा नाराजी व्यक्त केली होती. आता त्यांनी पत्राबाबत भाष्य करताना म्हटलं की, पाच पानी पत्र लिहिलं, त्यांनी लिहिलेलं पत्र योग्य नव्हतं. शिंदेंनी लिहिलेलं पत्र योग्य होतं म्हणून त्यांचे काम झाले.
भगतसिंह कोश्यारी यांनी उद्धव ठाकरेंसोबतच्या संबंधावर असंही म्हटलं की, माझे तर चांगले संबंध होते. पण त्यांचे सल्लागार कोण होते? त्यांची आमदार इथे येऊन बोलायचे की वाचवा आम्हाला, उद्धव शकुनी मामाच्या जाळ्यात फसले आहेत. मला नाही माहिती त्यांचा शकुनी मामा कोण होता?
उद्धव ठाकरे हे तर संत माणूस आहेत. राजकारणात कुठे येऊन अडकले. तुम्हालाही माहितीय की कशा पद्धतीने अडकले आहेत. पाच पानी पत्र लिहिलं म्हणून मी बोलतोय तुम्हाला. जर माणूस साधा नसता, सज्जन नसता आणि राजकारणी असता. शरद पवार यांच्यासारखं राजकारण माहिती असतं, अनुभव असता तर असं पत्र लिहिलं असता का? असा प्रश्नही भगतसिंह कोश्यारी यांनी विचारला.