महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । २२ फेब्रुवारी । महाराष्ट्रात दिवसा उन्हाच्या झळा असह्य होत आहेत तर रात्री थंडीचा कडाका सहन होत नसल्याचे सध्या चित्र आहे. दरम्यान मागच्या तीन दिवसांपासून दिवसा उन्हाच्या झळा वाढत असल्याचे दिसून येत आहे. मागच्या 24 तासांत सोलापुरात 37.4 अंश एवढ्या उच्चांकी तापमानाची नोंद झाली आहे. तर आणखी दोन दिवस उन्हाची तीव्रता अधिक राहणार असून त्यानंतर पुन्हा गारवा जाणवणार असल्याचा अंदाज हवामान तज्ञ माणिकराव खुळे यांनी व्यक्त केला आहे.
उत्तर भारतात पश्चिमी चक्रवातामुळे वातावरणात सतत्याने बदल होत आहेत. बुधवारपासून जम्मू- काश्मीर, उत्तराखंड, हिमाचल प्रदेशात हिमवृष्टी आणि पावसाचा अंदाज आहे. त्यामुळे दोन दिवसांनंतर पुन्हा राज्यातील वातावरणात गारवा पसरण्याची शक्यता आहे. राज्यात सध्या कोकण, मुंबई, ठाणे, मराठवाड्यासह विदर्भात कमाल तापमानात सरासरीपेक्षा 3 ते 4 अंशांनी वाढ झाली आहे. राज्यात मागच्या 24 तासांत नांदेड व धुळ्यात 37, परभणी 36.8, पुण्यात 36.4, जळगावात 36.5 तर औरंगाबादेत 36 अंश तापमानाची नोंद झाली.
राज्यात अचानक कमाल तापमानात वाढ झाली आहे. यामुळे फेब्रुवारी महिन्यातच उन्हाच्या झळा बसत आहेत. राज्यात उन्हाचा चटका सातत्याने वाढत आहे यामुळे नागरिकांमध्ये आरोग्याच्या समस्या वाढत आहेत. तर अचानक रात्री थंडी वाढत असल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. मंगळवारी (ता. 21) सकाळपर्यंतच्या 24 तासांमध्ये अकोला येथे राज्यातील उच्चांकी 38.5 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तर निफाड येथील गहू संशोधन केंद्रात नीचांकी 8.6 अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले.
राज्याच्या किमान तापमानात हळूहळू वाढ होत आहे. निफाड येथे गारठा कायम असला तरी उर्वरित राज्यात किमान तापमान 10 अंशांच्या पुढे गेले आहे. किमान तापमानात सातत्याने वाढ होत आहे. राज्याच्या किमान तापमानातील वाढीबरोबरच आणि किमान तापमानातील चढ-उतार सुरूच राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.