महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . २५ फेब्रुवारी । होळी आणि उन्हाळ्याच्या सुट्या अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या आहेत. त्यामुळे रेल्वे स्टेशनवर प्रवाशांची अतिरिक्त गर्दी होत असून प्रतिक्षा यादीही लांबत आहे. त्यासाठीच रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना होळी स्पेशल गिफ्ट देण्याचा निर्णय घेतला आहे. नागपूरहून गोव्याला जाणाऱ्या प्रवाशांसाठी नागपूर-मडगाव-नागपूर या विशेष रेल्वेगाडीचा विस्तार करण्यात येणार आहे.
होळीत आणि विशेषतः उन्हाळ्याच्या सुट्या घालविण्यासाठी अनेकांचा कल हा गोव्याकडे असतो. त्यामुळे दरवर्षी होणारी अतिरिक्त गर्दी पाहता रेल्वे प्रशासनाने गोव्याला जाणाऱ्या विशेष रेल्वेगाडीचा विस्तार करण्याचा निर्णय घेतला आहे. या विशेष रेल्वेगाड्या जुलै महिन्यापर्यंत चालविण्यात येणार आहेत.
गोव्यासाठी दोन विशेष रेल्वे
येत्या 25 फेब्रुवारी 2023 पर्यंत धावणारी रेल्वेगाडी क्रमांक 01139 नागपूर-मडगाव द्विसाप्ताहिक विशेष रेल्वेगाडी 1 जुलै 2023 पर्यंत आणि 26 फेब्रुवारीपर्यंत धावणारी रेल्वेगाडी क्रमांक 01140 मडगाव-नागपूर द्विसाप्ताहिक विशेष रेल्वेगाडी 2 जुलैपर्यंत चालविण्यात येणार असल्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. या दोन्ही गाड्यांच्या वेळेत, थांब्यात कुठलाही बदल करण्यात आलेला नाही. तर या दोन्ही रेल्वेगाड्यांचे आरक्षण 22 फेब्रुवारीपासून सुरू करण्यात आले आहे. प्रवाशांनी याची नोंद घेऊन आपला प्रवास निश्चित करण्याचे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.
पुण्यासाठी देखील विशेष सेवा
मध्य रेल्वे प्रशासनाने पुण्यासाठी देखील विशेष साप्ताहिक एसी सुपरफास्टच्या सहा फेऱ्यात वाढ केली आहे. त्यानुसार, आता ट्रेन नंबर 01443 पुणे अजनी होळी स्पेशल दिनांक 28 फेब्रुवारीपासून 14 मार्चपर्यंत प्रत्येक मंगळवारी प्रवाशांसाठी उपलब्ध राहील. ही गाडी पुण्याहून दुपारी 3.15 वाजता निघेल आणि नागपूरला अजनी स्थानकावर दुसऱ्या दिवशी पहाटे 4:50 वाजता पोहोचेल. तर 01444 अजनी पुणे स्पेशल ट्रेन 1 ते 15 मार्च पर्यंत प्रत्येक बुधवारी रात्री 7.50 वाजता अजनीहून निघेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी 11:35 वाजता पुण्यात पोहोचेल. या रेल्वे गाड्या पुणे ते नागपूर आणि परत पुणे असा प्रवास करताना दौंड यार्ड लाईन, कोपरगाव,मनमाड, भुसावळ,नांदुरा, अकोला, बडनेरा धामणगाव आणि वर्धा रेल्वे स्थानकावर थांबतील तेथे त्या प्रवासी उतरावतील आणि प्रवाशांना घेऊन पुढचा प्रवास करतील.
महाराष्ट्र एक्स्प्रेस पुण्यापर्यंतच
मध्य रेल्वेच्या पूणे विभागात करण्यात येणाऱ्या नॉन- इंटरलॉकिंगचे कामामुळे सातारा आणि कोरेगाव सेक्शनमध्ये डबलिंगसाठी 28 फेब्रुवारीला नॉन- इंटरलॉकिंगचे काम करण्यात येत आहे. या कामासाठी रेल्वेगाड्यांच्या वाहतुकीवर परिणाम होणार असून, महाराष्ट्र एक्स्प्रेस पुण्यालाच संपणार आणि तेथूनच धावणार आहे. रेल्वे प्रशासनाने घेतलेल्या निर्णयानुसार, रेल्वेगाडी क्रमांक 11040 गोंदिया- कोल्हापूर महाराष्ट्र एक्स्प्रेस 27 फेब्रुवारीला कोल्हापूरऐवजी पुणे रेल्वे स्थानकापर्यंतच धावणार आहे, तर रेल्वेगाडी क्रमांक 11039 कोल्हापूर-गोंदिया महाराष्ट्र एक्स्प्रेस 28 फेब्रुवारीला कोल्हापूरऐवजी पुणे रेल्वे स्थानकावरून सुटणार आहे. प्रवाशांनी या बदलाची नोंद घेण्याचे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.
विशेष गाड्या सुरू करण्याची मागणी
उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमुळे नागपूर-मुंबई, नागपूर- पुणे यासह विविध गाड्यांचे आरक्षण हाऊसफुल्ल झाले आहे. यासह नागपूर- हैद्राबाद आदी मार्गावर गरजेनुसार विशेष रेल्वे गाड्या चालविण्यात याव्या, अशी मागणी नागपूर रेल्वे प्रवासी संघटनेने केली आहे. तर काही गाड्या उशिरा चालत असल्याने रेल्वे प्रवाशांना त्रासाला सामोरे जावे लागत आहे.