महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . २७ फेब्रुवारी । राज्यात दिवसेंदिवस सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये संघर्ष पाहायला मिळतो आहे. शिवसेनेत दोन गट पडल्यानंतर हा संघर्ष आणखीनच तीव्र झाल्याचे दिसत आहे. त्यातच आता शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी भाजपवर एक गंभीर आरोप केला आहे. ते गडचिरोली येथे बोलत होते.
काय म्हणाले चंद्रकांत खैरे –
देशातील प्रादेशिक पक्ष संपवण्यासाठी प्रादेशिक पक्षांच्या मागे ईडी, सीबीआय, निवडणूक आयोग यासारख्या स्वायत्त संस्थांचा गैरवापर भाजप करीत असल्याचा गंभीर आरोप चंद्रकांत खैरे यांनी केला आहे. तसेच दुसरीकडे कोट्यावधी रुपयांचे आमिष दाखवून प्रादेशिक पक्षांमधील लोकप्रतिनिधी, नेते फोडण्याचे काम सुरू आहे, असा आरोपही चंद्रकांत खैरे यांनी केला आहे. शिवगर्जना यात्रेनिमित्त गडचिरोलीत आलेले चंद्रकांत खैरे पत्रकार परिषदेत अनेक मुद्द्यांवर बोलत होते.
आगामी सर्व निवडणुका मतपत्रिकेद्वारे घ्या, अशी आग्रही भूमिका शिवसेना पक्षाचे नेते चंद्रकांत खैरे यांनी गडचिरोलीत मांडली. राज्यात 48 जागा जिंकू, हा अमित शाह यांचा दावा कशाच्या आधारावर? असा सवालही त्यांनी केला आहे. ईव्हीएम सॅटेलाईटद्वारे नियंत्रित होत असल्याने भाजपला कौल मिळत असल्याचा आरोपही त्यांनी केला.
तर या पुढच्या काळात शिवसेना उद्धव ठाकरे गटाचा भर मतपत्रिकेद्वारे निवडणुका घेण्यावर राहणार असल्याचे विधान त्यांनी केले. शिवगर्जना यात्रेला गडचिरोलीत मोठा प्रतिसाद असल्याची माहिती त्यांनी दिली.
भाजपकडून भीमशक्ती व शिवशक्तीत भांडणे लावण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र, आम्ही घाबरणार नाही. भाजप कोणत्याही थराला जाऊन राजकारण करण्यास मागेपुढे पाहत नाही, असा आरोपही खैरे यांनी यावेळी केला. तर मुस्लिम समाज आणि वंचित आघाडीही शिवसेनेकडे वळायला लागले आहेत, असेही ते काल नागपूर येथे असताना म्हणाले होते.