महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .०१ मार्च । खासदार संजय राऊत यांनी विधिमंडळाला ‘चोरमंडळ’ म्हटले. यावरून शिवसेना आणि भाजप आमदार आक्रमक झाले. भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी संजय राऊत यांच्यावर हक्कभंग दाखल करण्याचा प्रस्ताव विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना दिला. या मुद्द्यावरून चार वेळा विधानसभेचे कामकाज तहकूब करण्यात आले. मात्र, या विषयावर सभागृहातील सदस्यांच्या तीव्र भावना लक्षात घेता अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी संजय राऊत यांनी विधिमंडळाच्या उज्वल परंपरेचा अपमान केला आहे. सभागृहाचा आणि महाराष्ट्राचा अपमान आहे. त्यामुळे दोन दिवसात चौकशी करून सभागृहात ८ मार्च रोजी पुढील निर्णय जाहीर करेन असे अध्यक्ष यांनी जाहीर केले.
शिवसेना आमदार संजय शिरसाट यांनी आपल्या भाषणात ज्या महाराष्ट्राचे नेतृत्व उद्धव ठाकरे यांनी केले. ज्या विधिमंडळात ते बसत होते त्या विधिमंडळाला चोर म्हटले हे शोभत नाही. महाराष्ट्राचे उभरते नेतृत्व आहे ते आदित्य ठाकरे त्यांना चोर म्हटला. अजित पवारला चोर म्हटलं. भुजबळ यांना चोर म्हटला, भास्कर जाधव यांना चोर म्हटलं, नाना पटोले यांना चोर म्हटले हा सभागृहाचा अपमान आहे. असे म्हणत उद्धव ठाकरे गटाचे आमदार आणि महाविकास आघाडीच्या आमदारांना चेतवण्याचा प्रयत्न केला.
भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी आचार्य अत्रे यांच्यापासून अनेक मोठे नेते या विधिमंडळाचे सदस्य आहेत. त्या विधिमंडळाला चोर म्हटले. या इसमाचा इतिहास काय आहे ? एका महिलेबद्दल जे संभाषण केले त्याची क्लीक देशाने ऐकली. महिलांविषयी अपशब्द ही यांची संस्कृती. काय दोष होता त्या महिलेचा. जो स्वतः आर्थिक गुन्ह्यात जामिनावर आहे तो इसम आरोपी आहे तो महाराष्ट्र विधिमंडळाला चोर म्हणतोय. त्याबद्दल त्यांच्यावर हक्कभंग दाखल झालाच पाहिजे अशी जोरदार मागणी त्यांनी लावून धरली.