What a Test match ! केन विलियम्सनने अखेरच्या चेंडूवर न्यूझीलंडला मिळवून दिला थरारक विजय

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .१३ मार्च । केन विलियम्सनने ( Kane Williamson) अखेरच्या चेंडूवर डाईव्ह मारली… श्रीलंकेच्या खेळाडूने अचूक नेम धरत चेंडू यष्टींच्या दिशेने फेकला…. केनची बॅट क्रिजच्या आत सरकली अन् तेवढ्यात चेंडू यष्टिंवर आदळला अन् जोरदार अपील झाले… धाकधूक वाढलेली… ७० षटकांत २८५ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना केन व डॅरील मिचेल यांनी प्रचंड घाम गाळलेला आणि त्याचा शेवट गोड व्हावा अशी सर्वांचीच इच्छा होती. न्यूझीलंडची ही एक धाव भारतासाठीही महत्त्वाची होती आणि त्यामुळे भारतीय फॅन्सही या सामन्यावर लक्ष ठेवून होते.

श्रीलंकेने पहिल्या डावात ३५५ धावा केल्या आणि न्यूझीलंडचा पहिला डाव ३७३ धावांवर गुंडाळला. श्रीलंकेला दुसऱ्या डावात ३०२ धावाच करता आल्या. अँजेलो मॅथ्यूजच्या शतकाच्या जोरावर श्रीलंकेला यजमान न्यूझीलंडसमोर २८५ धावांचे लक्ष्य ठेवता आले. पाचव्या दिवशी पावसामुळे बराच वेळ वाया गेल्याने षटकं कमी करावी लागली. डेव्हॉन कॉनवे ( ५), टॉम लॅथम ( २५) आणि हेन्री निकोल्स ( २०) माघारी परतल्यानंतर केन विलियम्सन व डॅरील मिचेल यांनी डाव सावरला. अखेरची १२ षटकं शिल्लक असताना दोघांनी आक्रमक खेळ सुरू करून संघाच्या विजयासाठी प्रयत्न केले.

यापूर्वीच्या १० षटकांत मिचेल व केन यांनी ७.५०च्या सरासरीने धावा चोपल्या. केन व मिचेल यांनी १५७ चेंडूंत १४२ धावांची भागीदारी करून संघाला विजयाच्या उंबरठ्यावर आणले. मिचेल ८६ चेंडूंत ३ चौकार व ४ षटकारांच्या मदतीने ८१ धावांवर बाद झाला. टॉम ब्लंडल ( ३) लगेच माघारी परतला. न्यूझीलंडला ३२ चेंडूंत ३९ धावांची गरज असताना निम्मा संघ माघारी परतला होता. केनने २७वे कसोटी शतक पूर्ण करताना किवींच्या विजयाचे प्रयत्न सुरू ठेवले होते. ३ षटकांत २० धावा किवींनी करायच्या होत्या आणि मिचेल ब्रेसवेल १० धावांवर बाद झाला. टीम साऊदीही बाद झाला अन् ६ चेंडू ८ धावा असा सामना रंजक वळणावर आला.

त्यातही एक विकेट पडलीच… केन खंबीरपणे उभा राहिला आणि शेवटच्या चेंडूवर १ धाव असा सामना होता.
असिथा फर्नांडोने बाऊन्सर फेकला अन् केनचा फटका चूकला. चेंडू यष्टिरक्षकाच्या हाती विसावला. तोपर्यंत नॉन स्ट्रायकर एंडवून नील वॅगनर एक धाव घेण्यासाठी पळाला होता. केननेही क्रिज सोडून धाव पूर्ण करण्याचा प्रयत्न केला. यष्टिरक्षकाने स्ट्रायकर एंडला थ्रो केला, परंतु चेंडू यष्टिंवर आदळला नाही. तो असिथाच्या हाती विसावला. असिथाने त्वरित तो नॉन स्ट्रायकर एंडच्या दिशेने फेकला अन् चेंडू यष्टिंवर आदळला. पण, त्याआधी केनने डाईव्ह मारली होती… केनची झेप सफल ठरली अन् न्यूझीलंडने थरारक विजयाची नोंद केली.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *