महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .१८ मार्च । प्राथमिक शिक्षण संचालनालयातर्फे शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) 25 टक्के राखीव जागांवरील प्रवेश प्रक्रियेत आतापर्यंत उपलब्ध जागांच्या तिप्पट अर्ज दाखल झाले आहेत. मात्र, काही तांत्रिक कारणांनी अर्ज भरण्यापासून विद्यार्थी वंचित राहिल्याने प्रवेश अर्जांसाठी 25 मार्चपर्यंत मुदतवाढ देण्यात आल्याची माहिती संचालक शरद गोसावी यांनी दिली.
यंदा राज्यातील 8 हजार 828 शाळांमध्ये 1 लाख 1 हजार 969 जागा प्रवेशासाठी उपलब्ध आहेत. या प्रवेश प्रक्रियेत अर्जांसाठी 1 मार्च ते 17 मार्च अशी मुदत देण्यात आली होती. त्यानुसार शुक्रवारपर्यंत 3 लाख 15 हजार 722 अर्ज दाखल झाले. मात्र, कागदपत्रे मिळण्यास झालेला विलंब तसेच तांत्रिक अडचणींमुळे अनेक विद्यार्थ्यांना अर्ज भरता आला नसल्याने प्रवेश अर्जांना मुदतवाढ देण्याची मागणी विविध संघटनांनी निवेदनाद्वारे केली होती. या पार्श्वभूमीवर गोसावी यांनी मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे आतापर्यंत अर्ज न केलेल्या पालकांना दिलासा मिळाला आहे. पालकांच्या मागणीनुसार ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी 25 मार्चपर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे. या मुदतीनंतर पुन्हा मुदतवाढ दिली जाणार नसल्याचे गोसावी यांनी स्पष्ट केले.