हवामान:राज्यात उन्हाचा चटका वाढणार, तापमानात 3 ते 5 अंशांनी वाढण्याची शक्यता

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .२८ मार्च । राज्यात विविध भागात सुरू असलेल्या अवकाळी पावसाने उघडीप दिली आहे. त्यामुळे राज्यात उन्हाचा चटका वाढला आहे. पुढील 3 दिवस तापमानात 3 ते 5 अंशांनी वाढ होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

विदर्भात मात्र अजूनही पावसाची शक्यता आहे. हवामान विभागाने आज आणि उद्या विदर्भात विजांसह पावसाची शक्यता वर्तवली आहे. तर, उर्वरित राज्यात हवामान कोरडे राहील, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

विदर्भ वगळता राज्यभरात निरभ्र आकाश

गेल्या काही दिवसांत अवकाळी पावसाने धुमाकूळ घातल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. परंतु, विदर्भातील चार जिल्हे वगळता कोकण, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्रातील पावसाळी वातावरण निवळले आहे. गेल्या काही दिवसांपासून पावसाने उघडीप दिल्यामुळे राज्यभरात निरभ्र आकाश आहे. त्यामुळे राज्यातील कमाल तापमानात पुन्हा वाढ होऊ लागली आहे. राज्यात बहुतांश ठिकाणी कमाल तापमान 31 ते 35 अंशांच्या दरम्यान होते. तर किमान तापमानाचा पारा 12 अंशांच्या पुढे आहे. गेल्या 24 तासांत निफाड येथे राज्यातील उच्चांकी 35.2 अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले आहे.

पूर्व दक्षिण भारतावर हवेचा कमी दाबाचा पट्टा

दक्षिण कर्नाटकपासून पश्चिम विदर्भापर्यंत समुद्रसपाटीपासून 900 मीटर उंचीवर हवेचा कमी दाबाचा पट्टा तामिळनाडू ते छत्तीसगड पर्यंत विस्तारला आहे. त्यामुळे विदर्भाच्या काही भागात विजा आणि मेघगर्जनेसह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. विदर्भातील नागपूर, भंडारा, गोंदिया व गडचिरोली या जिल्ह्यांत 30 मार्चपर्यंत ढगाळ वातावरण व किरकोळ पावसाची शक्यता तर, उर्वरित राज्यात मुख्यतः कोरड्या हवामानाचा अंदाज आहे.

उत्तर भारतात अवकाळीसाठी पोषक वातावरण

पुढील 24 तासांत पश्चिम हिमाचल आणि अरुणाचल प्रदेशात हलकी ते मध्य स्वरूपाची बर्फवृष्टी होऊ शकते. उत्तर भारतात हवामान स्वच्छ राहील. हवामान संस्था स्कायमेट आणि आयएमडीनुसार, दक्षिण-पश्चिम राजस्थानमध्ये वादळी वारे वाहू शकतात. तेलंगण, दक्षिण छत्तीसगड आणि ओडिशामार्गे झारखंडपर्यत कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. यामुळे हवामानात बदल पाहायला मिळत आहेत. उत्तर भारतातील राज्यांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसानंतर हवामानात बदल झाला आणि मार्चच्या उष्णतेपासून दिलासा मिळाला. पुढील तीन ते चार दिवस उत्तर भारतातील राज्यांत हवामान कोरडे राहण्याची अपेक्षा आहे. तसेच दिल्ली, पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेशच्या तापमानात 2 अंशांपर्यंत वाढ होऊ शकते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *