Vodafone Idea Debt: व्होडाफोन आयडिया बंद होण्याच्या मार्गावर, २३ कोटी ग्राहकांचं काय होणार?

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .२८ मार्च । मोठ्या कर्जाच्या ओझ्याखाली अडकलेली दूरसंचार कंपनी वोडाफोन आयडियाच्या समस्या सुटण्याचं नाव घेत नाहीये. एका अहवालानुसार, दूरसंचार क्षेत्रातील वाढत्या स्पर्धेमुळे व्होडाफोन आयडिया अडचणीत सापडली आहे. वाढत्या कर्जामुळे आणि आवश्यक निधी उभारण्यात होणारा विलंब यामुळे वाढलेल्या स्पर्धेमुळे कंपनीचे कामकाज बंद होण्याची शक्यता आहे.

देशांतर्गत ब्रोकरेज कंपनी कोटक इन्स्टिट्यूशनल इक्विटीजनं सोमवारी एका अहवालात हा दावा केला आहे. अहवालात असं म्हटलंय की महागाई दर हा रिझर्व्ह बँकेच्या अंदाजापेक्षा अधिक असल्यानं दूरसंचार कंपन्या पुढील वर्षीच्या सार्वत्रिक निवडणुकांनंतर, शक्यतो जून २०२४ मध्ये टॅरिफ दर वाढवण्यास सुरुवात करतील.

टॅरिफ दर वाढीशिवाय, व्होडाफोन आयडिया आवश्यक गुंतवणूक करू शकणार नाही आणि 5G सेवा सुरू करू शकणार नाही. यामुळे कंपनीच्या ग्राहकांची संख्या आणखी कमी होईल आणि भांडवल उभारणीची योजना प्रत्यक्षात आणणं कठीणही होईल.

रिपोर्टनुसार, यामुळे बाजारात रिलायन्स जिओ (Reliance Jio) आणि भारती एअरटेल (Bharti Airtel) या दोनच खासगी क्षेत्रातील कंपन्या उरतील. या कारणास्तव, दीर्घकालीन स्थितीत दोन कंपन्यांच्या मक्तेदारी स्थितीबद्दल चिंता आहे.

ब्रोकरेज कंपनीच्या म्हणण्यानुसार, टेलिकॉम कंपन्या सार्वत्रिक निवडणुकांनंतरच जून २०२४ मध्ये टॅरिफ वाढवण्याची शक्यता आहे. याचं कारण म्हणजे रिझर्व्ह बँकेच्या अंदाज मर्यादेपेक्षा अधिक असलेला महागाई दर आणि राज्यांमधील निवडणुका.

अहवालानुसार, “टॅरिफ दर वाढवण्यास विलंब झाल्यामुळं व्होडाफोन आयडियावर विपरित परिणाम होईल आणि बाजारात टिकून राहणं कठीण होईल. त्यामुळे दोन्ही कंपन्यांमध्ये मक्तेदारीची परिस्थिती निर्माण होईल. याशिवाय व्होडाफोन आयडियाला 4G कव्हरेज वाढवण्यासाठी आणि 5G सेवा सुरू करण्यासाठी गुंतवणूक वाढवणं आवश्यक असल्याचंही अहवालात म्हटलंय.

कंपनीने गुंतवणूक न केल्यास त्यांचा बाजारातील हिस्सा कमी होत राहील, असा इशारा अहवालात देण्यात आला आहे. “आमच्या अंदाजानुसार, व्होडाफोन आयडियाला पुढील १२ महिन्यांत ५,५०० कोटी रुपयांच्या रोख तुटवड्याचा सामना करावा लागू शकतो आणि कोणत्याही दरात वाढ न झाल्यानं किंवा भांडवल जमवण्यास उशीर झाल्यामुळे कामकाज बंद करावे लागू शकते,” असं अहवालात नमूद करण्यात आलंय.

ब्रोकरेज कंपनी Vodafone Idea चे रेटिंग देखील निलंबित केलं आहे. कंपनीवरील २.३ लाख कोटींहून अधिक कर्ज आणि बाजारहिस्सा कमी होण्याची शक्यता पाहता निधी उभारणे अवघड काम असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे. सोमवारच्या शेअर बाजाराच्या कामकाजादरम्यान कंपनीच्या शेअरची किंमत ६ रुपयांपर्यंत घसरली. ही ५२ आठवड्यांची नीचांकी पातळी आहे.

३१ डिसेंबर २०२२ च्या आकडेवारीनुसार, व्होडाफोन आयडियाचे देशात सुमारे २३ कोटी ग्राहक आहेत. ही देशातील तिसरी सर्वात मोठी दूरसंचार कंपनी आहे आणि ग्राहकांच्या संख्येनुसार जगातील ११ वी सर्वात मोठी कंपनी आहे. कंपनी बंद पडल्यास ग्राहकांचे काय होणार हा प्रश्न आहे.

ग्राहकांनी काळजी करू नये. कंपनीनं काम करणं बंद केल्यास, ग्राहकांना इतर दूरसंचार कंपन्यांमध्ये पोर्ट करण्यासाठी पुरेसा वेळ दिला जाईल. नियमांनुसार, टेलिकॉम कंपन्यांना भारतातील त्यांचे कामकाज बंद करण्यापूर्वी ग्राहकांना किमान ३० दिवसांची आगाऊ सूचना द्यावी लागते. या संदर्भात दूरसंचार नियामक TRAI (TRAI) ला ६० दिवस अगोदर नोटीस द्यावी लागेल.

जर एखाद्या ग्राहकाला त्याचा नंबर कायम ठेवायचा असेल तर त्याला दुसऱ्या कंपनीकडे जाण्याचा पर्याय आहे किंवा तो नवीन मोबाईल कनेक्शन देखील घेऊ शकतो. २०१८ मध्ये, जेव्हा एअरसेलनं आपली सेवा बंद केली तेव्हा ग्राहकांना दुसरा ऑपरेटर शोधावा लागला.

ट्रायनं त्यांना एक युनिक पोर्टिंग कोड दिला होता ज्याद्वारे ते मोबाइल नंबर पोर्टेबिलिटीसाठी निवडू शकतात. त्यांना दुसरं नेटवर्क निवडण्यासाठी ऑक्टोबर २०१९ ची मुदत देण्यात आली होती. तोपर्यंत पोर्टिंग रिक्वेस्ट पाठवण्यात अयशस्वी झालेल्यांना त्यांचे नंबर सरेंडर करावे लागले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *