पवारांचा हस्तक्षेप ; सावरकरांविषयी टीका न करण्याची राहुल गांधी यांची हमी

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . २९ मार्च । काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर यांच्याविषयी केलेल्या विधानांमुळे महाराष्ट्रात महाविकास आघाडीत विसंवादी सूर उमटल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी या प्रकरणी हस्तक्षेप केल्याचे समजते. यानंतर आता यापुढे राहुल सावरकरांविषयी कोणतेही वादग्रस्त विधान करणार नाहीत, असे विरोधी पक्षांच्या सोमवारी रात्री झालेल्या बैठकीत ठरविण्यात आले. राहुल यांनीही याबाबत पवारांना आश्वासन दिल्याचे कळते.

उद्धव ठाकरे यांच्यासाठी अडचणीच्या ठरणाऱ्या विषयांवर काँग्रेसच्या आघाडीच्या नेत्यांनी सातत्याने टीका करणे टाळले पाहिजे, असा स्पष्ट सल्ला पवार यांनी गांधी कुटुंबीयांना दिल्याचे समजते. पवारांच्या त्या सल्ल्यानंतरच राहुल गांधी यांनी, ‘यापुढे आपण सावरकर यांच्याबाबत वक्तव्य करणार नाही,’ असे म्हटल्याचे सूत्रांनी सांगितले. मोदी सरकारविरोधात विरोधी पक्षांमध्ये ऐक्य निर्माण करण्याचे प्रयत्न सुरू असतानाच राहुल यांनी सावरकरांविषयी केलेल्या विधानामुळे उद्धव ठाकरे गटाने डोळे वटारल्यावर या ऐक्यालाच तडा जाण्याची चिन्हे दिसू लागली होती.

संसदेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे यांच्या निवासस्थानी सोमवारी रात्री १७ विरोधी पक्षनेत्यांची बैठक झाली. संयुक्त पुरोगामी आघाडीच्या अध्यक्ष सोनिया गांधी, स्वतः राहुल व अनेक नेते बैठकीला हजर होते. मात्र, ठाकरे गटाने त्या बैठकीकडे पाठ फिरवली होती. त्यामुळे बैठकीत अस्वस्थता निर्माण झाली.

शरद पवारांनी मांडलेले मुद्दा

– सावरकर कधीही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सदस्य नव्हते.

– सध्या विरोधी पक्षांची लढाई पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपविरोधात आहे.

– सावरकरांवर टीका केल्याची महाराष्ट्रात प्रतिकूल प्रतिक्रिया उमटते. त्याचा महाविकास आघाडीला कोणताही लाभ होत नाही.

मशाल मोर्चा अडवला

काँग्रेसने राहुल गांधी यांच्यावरील कारवाईच्या निषेधार्थ मंगळवारी संध्याकाळी लाल किल्ला ते टाउन हॉल (चांदनी चौक) दरम्यान मशाल मोर्चा आयोजित केला होता. त्यासाठी पक्षाचे सारे खासदार व नेते लाल किल्ला परिसरात जमले होते. मात्र, मोर्चाला सुरुवात होताच दिल्ली पोलिसांनी तो अडवला. मोर्चाला परवानगी नाही, असे पोलिसांनी सांगताच काँग्रेस नेते व पोलिसांत बाचाबाची झाली. काही कार्यकर्त्यांनी पांढरे कापड जाळल्याने वातावरण अधिक तणावपूर्ण झाले. पोलिसांनी कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *