खासगी ट्रॅव्हल्सना टक्कर देण्यासाठी ‘लाल परी’ सज्ज, आता ST चा प्रवास होणार अधिक आरामदायी

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .३१ मार्च । महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची बस ही ग्रामीण महाराष्ट्राची जीवनवाहिनी मानली जाते. गेल्या कित्येक वर्षांपासून एसटी बस प्रवाशांची सेवा करत आहेत. आता एसटी नव्या रुपात प्रवाशांच्या सेवेसाठी सज्ज झाली आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानासह प्रवाशांना लक्झरी सेवा नवीन बसमध्ये मिळणार आहेत.राज्यभरातील विविध आगारांत नव्या रुपातील लाल परी दाखल होत आहेत. त्यामुळे आरामदायी आणि सुरक्षित प्रवास होणार आहे.बीड जिल्ह्यात राज्य परिवहन विभागाचे 8 आगार आहेत. या आगारांसाठी बीएस 6 या नवीन रुपातील 10 बस जिल्ह्यात दाखल झाल्या आहेत.आकर्षक लुक असणाऱ्या या बसमध्ये विविध सुविधाही देण्यात आल्या आहेत. बसण्यासाठी पुश बॅक सीट देण्यात आले असून आरामदायी प्रवासाची व्यवस्था करण्यात आली आहे.

आपत्कालीन स्थितीमध्ये बाहेर पडण्यासाठी बसमध्ये तीन ठिकाणी व्यवस्था करण्यात आली आहे. चालक, वाहक आणि मुख्य प्रवासी दरवाजाच्या बाजूने ही व्यवस्था आहे.पूर्वी प्रवाशांना बसमध्ये मोबाईल चार्जिंगची समस्या जाणवत होती. मात्र या बसमध्ये प्रवाशांसाठी चार्जिंगची सुविधा देखील उपलब्ध आहे.


लांब पल्ल्याचा प्रवास आरामदायी व्हावा म्हणून अनेकजण खासगी बसलाही प्राधान्य देत होते. परंतु, खासगी बसच्या दर्जाच्या सुविधा एसटी बसमध्ये उपलब्ध करून दिल्या जात आहेत.काही दिवसांपूर्वी राज्य सरकारने महिलांना बस प्रवासात 50 टक्के सवलत देण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे जिल्ह्यात प्रवाशांच्या संख्येतही मोठी वाढ झाली आहे.राज्य परिवहन मंडळाचा प्रवाशांना आरामदायी प्रवास सुविधा देण्याचा हेतू नेहमीच असतो. यातच आता बीएस 6 च्या आधुनिक 10 बस बीड विभागाला मिळाले आहेत. जिल्ह्यातील आगारांना मागणीनुसार आणखीन बस लवकरच मिळतील, असे विभागीय नियंत्रण अजयकुमार मोरे यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *