![]()
महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .२ एप्रिल । Weather Update : दिल्ली-यूपीसह देशातील अनेक राज्यांत हवामान विभागानं (Meteorology Department) अलर्ट जारी केलाय. तर, दुसरीकडं अनेक ठिकाणी वादळ आणि गारपिटीमुळं शेतकरी हैराण झाले आहेत.शेतकऱ्यांची पिकं उद्ध्वस्त झाली आहेत. दरम्यान, भारतीय हवामान खात्यानं (IMD) दिल्ली, उत्तर प्रदेश, पंजाब आणि उत्तर पश्चिम भारतातील इतर अनेक राज्यांमध्ये पावसाचा अंदाज वर्तवलाय.
या राज्यांमध्ये 3 ते 4 एप्रिल दरम्यान वादळ आणि गारपिटीसह मुसळधार पावसाची शक्यता असल्याचं हवामान खात्यानं सांगितलंय. त्याचबरोबर हिमाचल प्रदेश (Himachal Pradesh), उत्तराखंड, हरियाणा, राजस्थान आणि जम्मू-काश्मीरमध्ये पावसाची शक्यता आहे. दरम्यान, आज (रविवार) अरुणाचल प्रदेश, आसाम, मेघालय, नागालँड, मणिपूर, मिझोराम, त्रिपुरामध्ये हलका पाऊस बरसण्याची शक्यता आहे.
हवामान खात्यानं जारी केलेल्या ताज्या अपडेटनुसार, 3 आणि 4 एप्रिल रोजी वायव्य भारतात पाऊस, गडगडाट आणि गारपीट होण्याची शक्यता आहे. त्याच वेळी 5 एप्रिलपर्यंत ईशान्य भारतात हलका ते मध्यम पाऊस आणि जोरदार वारे वाहण्याची शक्यता आहे. आज म्हणजेच 2 एप्रिल रोजी ईशान्य भारतातही मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलीये.
हवामान खात्यानं (IMD) आंध्र प्रदेश, तेलंगणा, दक्षिण अंतर्गत कर्नाटक (Karnataka), तामिळनाडू (Tamil Nadu) आणि केरळमध्ये विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम पावसाचा अंदाज वर्तवला आहे. त्याचवेळी राजस्थानच्या अनेक भागात दोन दिवसांपासून पाऊस पडत आहे. तर, 5 एप्रिलपासून राज्यांत हवामान कोरडं राहण्याची शक्यता आहे. शिवाय, महाराष्ट्रातील काही भागात हलक्या सरी कोसळणार आहेत.