महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .२ एप्रिल । देशातील अनेक भागामध्ये पुन्हा एकदा कोरोनाने थैमान घालायला सुरुवात केली आहे. कोरोना बाधित रुग्णांची संख्या पुन्हा एकदा झपाट्याने वाढू लागली आहे. मागील चार महिन्यांनंतर, शनिवारी देशात कोरोनाची 2,994 नवीन प्रकरणे नोंदवण्यात आली आहेत, तर सक्रिय रुग्णांची संख्या 16,354 झाली. त्यामुळे आता लोकांना कोरोनाच्या चौथ्या लाटेची भीती वाटू लागली आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, संसर्गाच्या नवीन प्रकरणांसह भारतात कोविड -19 प्रकरणांची संख्या 4.47 कोटी झाली आहे. दरम्यान, 9 जणांचा मृत्यू झाला असून मृतांची संख्या 5,30,876 झाली आहे.
कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे दिल्ली, कर्नाटक आणि पंजाबमध्ये प्रत्येकी दोन मृत्यू झाले आहेत. गुजरातमध्ये एक आणि केरळमध्ये दोघांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. कोरोनाची 16,354 सक्रिय प्रकरणे आहेत, जी संसर्गाच्या एकूण प्रकरणांच्या 0.04 टक्के आहेत.
आरोग्य मंत्रालयाच्या वेबसाइटनुसार, कोविड-19 मधून बरे होण्याचा राष्ट्रीय दर 98.77 टक्के आहे. पीटीआयने दिलेल्या माहीतीनुसार, रोजचा पॉझिटिव्हिटी रेट 2.09 टक्के आणि आठवड्याचा 2.03 टक्के नोंदवला गेला आहे.
दिल्लीमध्ये शनिवारी कोरोना विषाणूच्या संसर्गाची 416 नवीन प्रकरणे समोर आली आहेत, तर संसर्ग दर 14.37 टक्क्यांवर पोहोचला आहे. गेल्या सात महिन्यांतील एका दिवसातील ही सर्वाधिक प्रकरणे आहेत. आरोग्य विभागाने शेअर केलेल्या आकडेवारीवरून ही माहिती समोर आली आहे. आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार, संसर्गामुळे मृत्यू झाल्याची एक घटना समोर आली असून मृतांची संख्या 26529 झाली आहे.