महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . ३ एप्रिल । देशात बेरोजगारीने कळस गाठला आहे. बेरोजगारी दिवसेंदिवस वाढत चालली आहे. मार्च महिन्यात बेरोजगारीचा दर गेल्या तीन महिन्यांत सर्वाधिक 7.80 टक्के राहिला. म्हणजेच देशात दर एक हजार व्यक्तींमागे 78 जण बेरोजगार आहेत. शहरी भागांमध्ये हा दर 8.51 टक्के होता. महाराष्ट्रात हा आकडा दर एक हजार व्यक्तींमागे 55 इतका आहे. बेरोजगारीमुळे तरुणवर्गात प्रचंड संताप व्यक्त होत आहे.
सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमीने (सीएमआयई) 1 एप्रिल रोजी देशातील बेरोजगारीचा दर जाहीर केला. त्यानुसार देशातील बेरोजगारीचा एकूण दर मार्चमध्ये 7.80 टक्क्यांवर पोहोचला. ग्रामीण भागांमध्ये तो 7.47 टक्के तर शहरी भागांमध्ये 8.51 टक्के होता. गेल्या तीन महिन्यांतला हा सर्वाधिक दर नोंदला गेला. तत्पूर्वी फेब्रुवारीमध्ये तो 7.45 टक्के तर जानेवारीत 7.14 टक्के होता. गेल्या वर्षी ऑगस्ट, नोव्हेंबर आणि डिसेंबरमध्ये बेरोजगारीचा दर आठ टक्क्यांवर पोहोचला होता.
गुजरातमधील बेरोजगारीचा दर घसरला
महाराष्ट्रासह देशातील अन्य राज्यांमधील लाखो कोटी रुपयांची गुंतवणूक असणारे उद्योग पळवणाऱ्या गुजरातमधील बेरोजगारी मात्र कमी झाल्याचे दिसून आले आहे. मार्च महिन्यात गुजरातमधील बेरोजगारीचा दर अवघा 1.8 टक्के इतका होता.
असा ठरतो बेरोजगारीचा दर
मार्च महिन्यात बेरोजगारीचा दर 7.8 टक्के इतका होता. म्हणजेच नोकरीच्या शोधात असलेल्या दर एक हजार व्यक्तींमागे 78 जणांना नोकरी मिळाली नाही. सीएमआयई दर महिन्याला घरोघरी जाऊन 15 वर्षांवरील प्रत्येक व्यक्तीचे सर्वेक्षण करते आणि त्यांच्या रोजगाराच्या स्थितीबाबत माहिती घेते. त्या माहितीच्या आधारे अहवाल बनवला जातो.
हरयाणात सर्वाधिक बेरोजगार
देशात सर्वाधिक बेरोजगारी ही हरयाणा राज्यात आहे. मार्च महिन्यात हरयाणातील बेरोजगारीचा दर 26.8 टक्के इतका होता. त्यानंतर राजस्थान (26.4 टक्के), जम्मू-कश्मीर (23.1 टक्के), सिक्कीम (20.7 टक्के) असे बेरोजगारीचे प्रमाण आहे.
सर्वात कमी छत्तीसगड, उत्तराखंडमध्ये
देशात बेरोजगारीचा सर्वात कमी दर छत्तीसगड आणि उत्तराखंडमध्ये नोंदला गेला. या दोन्ही राज्यांमध्ये मार्च महिन्यात बेरोजगारीचा दर 0.8 टक्के होता.