मी 24 तास पाण्यावर तरंगू शकतो, अंनिसच्या साहेबांनी हे करून दाखवावं, तरंगणाऱ्या बाबांचं ओपन चॅलेंज!

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . ५ एप्रिल । महाराष्ट्रात आता पाण्यावर तरंगणाऱ्या बाबांनी (Floating on water) लक्ष वेधून घेतलंय. हिंगोलीत (Hingoli) दोन दिवसांपासून पाण्यावर तरंगणाऱ्या बाबांची चर्चा सुरु आहे. मी 24 तास पाण्यावर तरंगू शकतो. केवळ उपवास, ब्रह्मचर्य आणि नामस्मरणाच्या सामर्थ्यातून मी हे करू शकतो. मीच नव्हे तर माझी पत्नी देखील २४ तास पाण्यावर तरंगू शकते, असा दावा हिंगोलीतील हभप राठोड महाराज यांनी केला. अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या सदस्यांनी या महाराजांना गाठलं. ते जे दावे करत आहेत, ते चमत्कार किंवा दैवी शक्ती नसून केवळ सरावाचा भाग आहे, असं वक्तव्य केलं. यावरून या बाबांनी अंनिसलाच आव्हान दिलं. मी २४ तास पाण्यावर तरंगतो, तुम्हीही तरंगून दाखवा. तसं केलं तर तुम्हाला मी गुरु मानतो, अस चॅलेंज या बाबांनी दिलं. हिंगोलीत आज अंनिसचे जिल्हा अध्यक्ष प्रकाश मगरे आणि राठोड महाराजांनी एकमेकांना दिलेलं हे आव्हान आजमावून पाहिलं..

अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे सदस्यांनी हिंगोलीतील या महाराजांचं चॅलेंज स्वीकारलं. ठरल्याप्रमाणे आज हिंगोलीत अंनिसचे सदस्य आणि राठोड महाराज पाण्यात उतरले. जवळपास दीड मिनिटं हे दोघेही पाण्यावर तरंगत राहिले. मात्र अंनिसच्या सदस्यांना काही वेळानंतर हालचाल करावी लागली. राठोड महाराज तसेच तरंगत राहिले.

गावात भागवत कथा सुरु असल्याने जमलेल्या भाविक आणि गावकऱ्यांनी मग महाराजांना विहिरीतून बाहेर येण्याची गळ घातली. त्यानंतर हे महाराज देखील पाण्यातून वर आले.

कोण आहेत महाराज?
पाण्यावर तरंगणाऱ्या या बाबांचं नाव हरीभाऊ राठोड असे आहे. हिंगोली तालुक्यातील धोतरा या गावात भागवत कथा वाचण्यासाठी महाराजांना आमंत्रित करण्यात आलं होतं. हे महाराजदेखील हिंगोली जिल्ह्यातील दुर्गसावंगी येथील मूळ रहिवासी आहेत. गेल्या काही दिवसांपासून हरीभाऊ राठोड यांची धोतरा गावात भागवत कथा आयोजित करण्यात आली आहे. यावेळी त्यांनी मी आणि माझी पत्नी २४ तास पाण्यात तरंगत राहू शकतो, असा दावा केला. देवाचं नामस्मरण आणि उपवास केल्याने मी असं तरंगून दाखवू शकतो, असं राठोड म्हणाले.

अंनिस आणि पोलिसांचं म्हणणं काय?
हरिभाऊ राठोड यांनी दिलेल्या आव्हानानुसार, आज धोतरा गावात अंनिस आणि राठोड महाराज दोघांनीही पाण्यावर तरंगून दाखवलं. सरावानंतर कोणत्याही प्रकारचं कौशल्य प्राप्त करून घेता येतं, यात महाराजांनी दैवी शक्ती किंवा चमत्कार केला असा दावा करू नये, अन्यथा जादूटोणा कायद्याचं उल्लंघन होऊ शकतं, असं वक्तव्य अंनिसचे जिल्हाध्यक्ष प्रकाश मगरे यांनी केलं. तर पोलिसांनीदेखील राठोड महाराज यांनी अशा प्रकारचा कोणताही चमत्काराचा दावा केलेला नाही, अशी प्रतिक्रिया दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *