महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . ११ एप्रिल । देशाच्या राजकीय पटलावर आम आदमी पक्ष (आप) मोठा डाव टाकण्याच्या तयारीत आहे. कर्नाटकनंतर राजस्थान, मध्य प्रदेश व छत्तीसगडमध्ये निवडणुकीपूर्वी निवडणूक आयोगाने सोमवारी ‘आप’ला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा दिला. तर ममतांचा तृणमूल, शरद पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस आणि भारतीय कम्युनिस्ट पक्षाकडून (सीपीआय) हा दर्जा काढून घेतला. आपने चारही राज्यांतील सुमारे ७५० विधानसभेच्या जागांसह लोकसभेच्या ५० पेक्षा अधिक जागांवर स्वत:साठी रोडमॅप तयार केला आहे. कर्नाटकातील सर्व २२४ जागांवर निवडणूक लढवणाऱ्या आपला राजस्थानकडून सर्वाधिक अपेक्षा आहेत.
काँग्रेसमध्ये सचिन पायलट व मुख्यमंत्री अशोक गहलोत यांच्यातील, तसेच भाजपमध्ये वसुंधराराजे व उर्वरित पक्षांतील राजकीय डावपेचांचा फायदा घेण्याची संधीही अरविंद केजरीवाल यांच्या पक्षासमोर आहे. यासाठी आप राजस्थानात आपल्या कार्यकर्त्यांचे सोशल नेटवर्क तयार करत आहे. याद्वारे पक्ष इतर पक्षांतील नाराज कार्यकर्ते व नेत्यांना सोबत घेण्याच्या दुहेरी धोरणावर काम करत आहे.