महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . १७ एप्रिल । येत्या 15 दिवसांत महाराष्ट्रात आणि देशाच्या राजकारणात दोन मोठे राजकीय बॉम्बस्फोट होतील. नेमके काय होईल? हे आणखी 15 दिवस थांबा, मग कळेल, असा गौप्यस्फोट वंचित बहुजन विकास आघाडीचे प्रमुख अॅड. बाळासाहेब आंबेडकर यांनी रविवारी पुण्यात केला. पुणे श्रमिक पत्रकार संघ येथे एका कार्यक्रमासाठी आंबेडकर आले होते, त्या वेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. येत्या 15 दिवसांत महाराष्ट्रात मोठे राजकारण बघायला मिळेल.
दोन ठिकाणी मोठे राजकीय स्फोट होणार आहेत. त्यामुळे आपण 15 दिवस वाट बघूया. या वेळी त्यांना राज्यातील सरकार पडणार का? असे विचारले असता, येत्या 15 दिवसांत सर्वांना सर्वकाही समजेल, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. अतीक आणि अश्रफ अहमद यांच्या हत्येवर ते म्हणाले, एकीकडे गुन्हेगारांना कायद्याने आळा घालायचा नाही आणि दुसरीकडे त्यांना गोळ्या घालण्याचा प्रकार सुरू आहे. या प्रकारची बंडखोरी बर्याच वर्षांपासून सुरू आहे, असे ते म्हणाले.
राजकारणासाठी सैन्यांचा बळी?
माजी राज्यपाल सत्यपाल मलिक आत्ता बोलले आहेत. पण, मी हे सर्व त्या वेळीच बोललो होतो. ज्या गाडीत स्फोट झाला, त्या गाडीला संरक्षण नव्हते, ही माहिती मला मिळते, तर लष्कर आणि सरकारलाही मिळू शकते. पण, सरकारला राजकारण करायचे होते. दहा गाड्यांच्या ताफ्याबद्दलची साधी माहिती कॉन्स्टेबलला होती. ती बाब राज्यकत्र्यांना कशी माहीत नसावी? त्यामुळे त्यांची साधी चौकशीसुद्धा झाली नाही. राजकारणासाठी या जवानांचा बळी दिलाय का? असा प्रश्न मी आजही उपस्थित करतो आहे, असेही आंबेडकर म्हणाले.