महाराष्ट्र सलून असोसिएशनच्या दरवाढीमुळे केसासह आता आपला जुना लूक पुन्हा मिळवण्यासाठी खिशालाही लागणार कात्री

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – मुंबई – विशेष प्रतिनिधी – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशभरात लागू असलेल्या लॉकडाऊनमुळे देशभरातील प्रत्येक घरात केस आणि दाढी वाढलेले पुरुष असे चित्र पाहायला मिळत आहे. त्यातच आपल्यापैकी अनेकांच्या तोंडी लॉकडाउन उठल्यानंतर सर्वात आधी जाऊन केस कापणार असे वाक्य आहे. पण लॉकडाउननंतर आता तुम्हाला केस कापण्यासाठी आणि दाढी करण्यासाठी तुम्हाला दुप्पट, तिप्पट पैसे मोजावे लागणार आहेत. कारण महाराष्ट्र सलून आणि पार्लर असोसिएशनने लॉकडाउनमुळे आर्थिक फटका बसल्याने दरवाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे आपला जुना लूक पुन्हा मिळवण्यासाठी खिशालाही थोडी कात्री लावावी लागणार आहे.

देशभरातील सर्वच क्षेत्रांना लॉकडाउनचा खूप मोठा फटका बसला आहे. यामुळे लॉकडाउन उठवल्यानंतर जेव्हा सर्व काही सुरळीत होईल, तेव्हा विस्कटलेली आर्थिक घडी पुन्हा एकदा व्यवस्थित करण्याचे आव्हान सर्वच क्षेत्रावंर असणार आहे. याच पार्श्वभूमीवर दाढी-कटिंगसह इतर सेवांचा दर तब्बल दुप्पट करण्याचा निर्णय महाराष्ट्र सलून आणि पार्लर असोसिएशनने घेतला आहे. लॉकडाउन जाहीर झाल्यापासून सलून, ब्युटी पार्लर कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी बंद ठेवण्यात आली आहे.

आता महाराष्ट्र सलून आणि पार्लर असोसिएशनने केलेल्या दरवाढीनुसार, केस कापण्यासाठी आता १०० ते १२० रुपये मोजावे लागणार आहेत. केस कापण्यासाठी याआधी ६० ते ८० रुपये दर होता. तर दाढी करण्यासाठी जिथे आधी ४० ते ५० रुपये मोजावे लागत होते, तिथे आता ८० रुपये मोजावे लागणार आहेत.

दरम्यान ज्यावेळी सलून सुरु होतील तेव्हा ग्राहकांना कोरोनाची लागण होऊ नये यासाठी सुरक्षेची पुर्ण खबरदारी घ्यावी लागणार आहे. पीपीई किट तसेच इतर साहित्य खरेदी करावे लागणार असल्याने त्यांच्या खर्चात वाढ होणार आहे. यासोबत अनेक सलून हे भाड्याच्या ठिकाणी सुरु असल्याने त्याचा आर्थिक भारदेखील त्यांच्यावर असणार आहे. यामुळेच हा दरवाढीचा निर्णय घेण्यात आला आहे.

याबाबत माहिती देताना महाराष्ट्र सलून आणि पार्लर असोसिएशनचे अध्यक्ष सोमनाथ काशिद यांनी सांगितले आहे की, काही भागांमध्ये सलून सुरु झाले असले तरी खर्चही खूप आहे. त्यात पीपीई किट सुरक्षेसाठी घ्यायचे आहे. सॅनिटायजिंगची व्यवस्थाही करावी लागणार आहे. त्यामुळे वाढणारा खर्च लक्षात घेता दरवाढ दुप्पट करण्याचा निर्णय घेण्यात आला. सलून व्यवसाय गेल्या तीन महिन्यांपासून अडचणीत असून अनेक आर्थिक आव्हाने आहेत. त्यामुळे लोकांनी सहकार्य करावे तसेच ज्या भागांमध्ये सलून बंद आहेत, तिथे सरकारने सुरु कऱण्याची परवानगी द्यावी अशी आमची विनंती आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *