महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – पिंपरी चिंचवड – विशेष प्रतिनिधी – पी.के.महाजन – महापलिका सभा संपल्यानंतर स्थायी समिती अध्यक्षांच्या अँटी चेंबरमध्ये सत्ताधारी भाजपचे नगरसेवक विलास मडिगेरी यांना मारहाण झाली. त्यांना खासगी रुग्णालयात दाखल केले आहे. मारहाण कोणी केली याबद्द्ल रात्री उशिरापर्यंत फिर्याद दाखल झालेली नव्हती.
मारहाणीचा प्रकार आज (सोमवार) सायंकाळी घडला. महापालिका मुख्य इमारतीमध्ये तिसऱ्या मजल्यावर स्थायी समिती अध्यक्षांचा कक्ष आहे. त्याला लागूनच अँटी चेंबर आहे. तिथे मडिगेरी बसले होते. यावेळी अचानक जोरजोरात आरडाओरड सुरू झाली. ती ऐकून काही पदाधिकारी, नगरसेवक धावले. यावेळी रक्तदाब वाढुन मडिगेरी खाली कोसळले होते, असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. त्यांना तत्काळ महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयात नेले. त्यानंतर खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.