सरकार जाणार की राहणार? ; देवेंद्र फडणवीस यांचं चारओळीचं ट्विट, नव्या चर्चांना उधाण

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . १९ एप्रिल । राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार हे भाजपसोबत जाणार असल्याची गेल्या काही दिवसांपासून चर्चा सुरू आहे. अजित पवार यांचं नॉटरिचेबल होणं, भाजपच्या बाजूने विधानं करणं आणि सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी ट्विट करणं… या सर्व गोष्टी लागोपाठ घडल्याने अजित पवार भाजपसोबत जाण्याच्या चर्चांना अधिकच बळकटी मिळाली. मात्र, काल अजित पवार यांनी मीडियासमोर येऊन या अफवा असल्याचं सांगितलं. शेवटच्या श्वासापर्यंत राष्ट्रवादीतच राहणार असल्याचं अजित पवार यांनी स्पष्ट केलं. त्यामुळे या चर्चांचा धुरळा बसलेला असतानाच आता राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ट्विटने चर्चांचा धुरळा उठला आहे. फडणवीस यांच्या ट्विटमुळे सरकार राहणार की जाणार? अशा चर्चांना उधाण आलं आहे.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या दोन फोटोंसह हे ट्विट केलं आहे. मिशन नो पेंडेन्सी असा हॅशटॅग देऊन त्यांनी हे ट्विट केलं आहे. कार्यालयीन कामकाजातील प्रलंबित कामे मार्गी लावताना असं ट्विट देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. फोटोमध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या टेबलवर फायलींचा मोठा ढिग दिसत आहे. या फायलींवर फडणवीस सह्या करताना दिसत आहेत. फडणवीस अत्यंत प्रसन्न मुद्रेत आहेत. दुसऱ्या फोटोत त्यांचा चेहरा गंभीर दिसत आहे. फडणवीस यांनी कामाचा निपटारा करत असल्याचं ट्विट केल्याने अनेकतर्कवितर्क व्यक्त केले जात आहेत.

सरकार जाणार?
फडणवीस यांच्या ट्विटचे राजकीय अर्थ लावले जात आहेत. सर्वोच्च न्यायालयात राज्यातील सत्तासंघर्षावर सुनावणी पूर्ण झाली आहे. राज्याच्या सत्तासंघर्षावर केव्हाही निकाल येण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविरोधात हा निकाल जाण्याची सर्वात अधिक शक्यता वर्तवली जात आहे. या पार्श्वभूमीवर फडणवीस यांच्या ट्विटला अधिक महत्त्व आलं आहे. विशेष म्हणजे राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी भाजपसोबत जाणार नसल्याचं विधान केलं आहे. त्यानंतर अवघ्या काही तासात फडणवीस यांनी हे ट्विट केलं आहे. अजितदादा भाजपसोबत येणार नाही. त्यामुळे कोर्टाचा निकाल विरोधात गेला तर सरकार राहणार नाही. त्यामुळे फडणवीस फायली मार्गी लावत असल्याचं सांगितलं जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *