महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . २३ एप्रिल । आता निश्चितपणे वृद्ध झालो आहे. यामुळे आता माझ्या क्रिकेट करिअरमधील हा शेवटचा टप्पा आहे. कारण, आता खेळतानाही थकवा जाणवतो. यामुळे आता थांबवण्याची योग्य वेळ आली आहे. त्यामुळे लवकरच याबाबतचा निर्णय घेणार आहे, अशा शब्दामध्ये चेन्नई सुपरकिंग्ज संघाच्या ४१ वर्षीय कर्णधार महेंद्रसिंग धोनीने आयपीएलमधूनही निवृत्तीचे संकेत दिले. त्याच्या नेतृत्वाखाली चेन्नई संघाने शुक्रवारी घरच्या मैदानावर मार्करामच्या हैदराबाद टीमविरुद्ध विजय साजरा केला. यासह चेन्नई संघाला आपले तिसरे स्थान कायम ठेवता आले. या विजयानंतर धोनीने आपल्या भावना व्यक्त केल्या.
यामुळे आता पुण्याच्या युवा फलंदाज ऋतुराज गायकवाडला चेन्नई सुपरकिंग्ज संघाचे नेतृत्व करण्याची संधी आहे. मात्र, याच कर्णधारपदासाठी रवींद्र जडेजा आणि इंग्लंडचा बेन स्टोक्सही दावेदार आहे. गत सत्रादरम्यान जडेजाकडे संघाच्या नेतृत्वाची धुरा सोपवण्यात आली होती. मात्र, काही प्रमाणात वितुष्ट निर्माण झाल्याने जडेजाला कर्णधारपद सोडावे लागले. यामुळे आता स्टोक्स आणि ऋतुराज हे दोघेच नेतृत्वासाठीचे प्रबळ दावेदार मानले जात आहेत. कर्णधार धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नई संघाची आयपीएलमधील कामगिरी लक्षवेधी ठरली. संघाने चार वेळा आयपीएलचा किताब पटकावला आहे.
१४ मे रोजी धोनीचा शेवटचा आयपीएल सामना
कर्णधार महेंद्रसिंग धोनीने आता निवृत्तीचे संकेत दिले आहे. यामुळे तो चेन्नई संघाकडून १४ मे रोजी आयपीएलमधील आपला शेवटचा सामना खेळण्याची शक्यता आहे. चेन्नईमध्येच दोन प्लेऑफ सामने होणार आहेत. सध्या चेन्नई संघ गुणतालिकेमध्ये तिसऱ्या स्थानावर आहे. यामुळे टीमला प्लेऑफ प्रवेशाची संधी आहे. यामुळे धोनीची निवृत्तीही लांबणीवर पडू शकते. यामुळे आता चेन्नई संघाला आगामी सामन्यांदरम्यान दर्जेदार कामगिरी करावी लागणार आहे. यातून संघाला प्ले ऑफमधील प्रवेश निश्चित करता येईल. यादरम्यान धोनी हा खेळताना दिसणार आहे.