महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . २३ एप्रिल । साडेतीन शुभ मुहूर्तापैकी एक असलेल्या अक्षय तृतीयेला मालमत्ता खरेदी-विक्रीची दस्तनोंदणी करण्याकडे नागरिकांचा कल असतो. त्यामुळे शनिवारी (२२ एप्रिल) शासकीय सुटी असूनही शहरातील पाच दस्तनोंदणी कार्यालये सुरू ठेवण्यात आली होती. या कार्यालयांत सुमारे १२५ दस्तांची नोंदणी होऊन एक कोटी २० लाख रुपयांचा महसूल प्राप्त झाला.
नागरिकांच्या मागणीनुसार सह दुय्यम निबंधक कार्यालये शासकीय सुटीच्या दिवशी सुरू ठेवण्यात आली होती. शहरात सिद्धी टॉवर, दापोडी येथील हवेली क्र. १७ आणि हवेली क्र. २५, युगाई मंगल सभागृह, एरंडवणे येथील हवेली क्र. २२ आणि हवेली क्र. २१, शासकीय छायाचित्र नोंदणी कार्यालय येथील हवेली क्र. २३ ही दस्त नोंदणी कार्यालये सुरू होती. या कार्यालयांत दिवसभरात १२५ दस्तांची नोंदणी होऊन एक कोटी २० लाख रुपयांचा महसूल मिळाल्याचे नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाकडून सांगण्यात आले.