महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . २९ एप्रिल । बीड कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आमदार संदीप क्षीरसागरांनी काका जयदत्त क्षीरसागरांच्या चाळीस वर्षाच्या सत्तेला सुरुंग लावलाय. आमदार संदीप क्षीरसागर यांनी 5 पक्षांची मोट बांधून काका विरोधात कडवे झुंज देत 18 पैकी 15 जागेवर दणदणीत विजय मिळवला. बीड बाजार समितीवर सर्वपक्षीय आघाडीचा झेंडा फडकवला आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीचा निकाल हाती आला. यामध्ये संदीप क्षीरसागर यांनी जयदत्त क्षीरसागरांना धोबीपछाड केले.
बाजार समितीत विजयानंतर संदीप यांच्या समर्थकांनी एकच जल्लोष केलाय. मागील 40 वर्षांपासून बीड कृषी उत्पन्न बाजार समितीवर माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांची एक हाती सत्ता होती. ही निवडणुक प्रतिष्ठेची बनवून आमदार संदीप क्षीरसागर यांनी शिंदे गट, ठाकरे गट, भाजपा, शिवसंग्राम आणि राष्ट्रवादी पक्षाची मोट बांधून निवडणुकीला सामोरे गेले होते. आता यावरूनच संदीप क्षीरसागर यांनी काकांना निवडणुकीमध्ये धोबीपछाड केले आहे. त्यामुळे क्षीरसागर यांना हा मोठा धक्का मानला जातो आहे.
पंकजा मुंडेंना मोठा धक्का
बीडच्या परळीत पंकजा मुंडे यांना धक्का बसला आहे. परळी वैजनाथ कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आमदार धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसच्या पॅनलची विजयी आघाडी असून आतापर्यंत 18 पैकी 11 सोसायटीच्या जागांवर विजय मिळवला आहे. अद्याप उर्वरित सात जागांची मतमोजणी झालेली नाही.
आंबाजोगाईतही धनंजय मुंडेंची सरशी
आंबाजोगाई बाजार समितीच्या निवडणुकीमध्ये एकूण आठरा जागांपैकी तब्बल 15 जागांवर मविआनं बाजी मारली आहे. तर तीन जागांवर भाजपचा विजय झाला आहे. ही निवडणूक मविआच्या पॅनलने धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वाखाली लढवली होती. या निवडणुकीमध्ये पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांची प्रतिष्ठा पणाला लागल्यानं या निवडणुकीकडे जिल्ह्याचं लक्ष लागलं होतं.