महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . १ मे । राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या ‘लोक माझे सांगती’ या पुस्तकाच्या दुसऱ्या भागाचे प्रकाशन मंगळवारी 2 मे रोजी यशवंतराव चव्हाण सभागृहात सकाळी 11 वाजता होणार आहे. मीडिया रिपोर्टनुसार या पुस्तकामध्ये शरद पवार यांनी अनेक खळबळजनक खुलासे केले आहेत. समोर येत असलेल्या माहितीनुसार या पुस्तकात शरद पवार यांनी म्हटलं आहे की, सुरुवातीला विधानसभा निवडणुकांमध्ये शिवसेना भाजप युतीत शिवसेना 171 जागा लढवायची तर भाजप 117 जागा. मात्र 2019 च्या निवडणुकीमध्ये चित्र बदललं, 2019 ला भाजपकडून 164 जागांवर उमेदवार उभे करण्यात आले तर शिवसेनेला 124 जागा देण्यात आल्या. यामागे शिवसेनेचं खच्चीकरण करण्याचा उद्देश होता असा दावा शरद पवार यांनी या पुस्तकात केल्याची माहिती समोर येत आहे.
नारायण राणेंबाबत खुलासा
दरम्यान या पुस्तकामध्ये शरद पवार यांनी नारायण राणे यांच्याबद्दल देखील मोठा खुलासा केल्याची माहिती समोर येत आहे. नारायण राणे आणि शिवसेनेमध्ये टोकाचे मतभेत आहेत. भाजपने नारायण राणे यांचा पक्ष भाजपात विलीन करून शिवसेनेच्या दु:वर मीठ चोळण्याचं काम केलं असं शरद पवार यांनी म्हटलं आहे. तसेच 2019 मध्ये शिवसेनेच्या अनेक उमेदवारांना बंडखोरांचा सामना करावा लागला. यातील अनेक बंडखोरांना भाजपाचं पाठबळ होतं, असा खुलासाही शरद पवार यांनी या आपल्या पुस्तकात केल्याची माहिती समोर येत आहे.
प्राप्त रिपोर्टनुसार शरद पवार यांनी आपल्या या पुस्तकात म्हटलं आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांना शिवसेनेबद्दल कसलीही सहानुभूती नव्हती. ते त्यांच्या बॉडी लॅग्वेजमधून जाणवायचं. मात्र शिवसेनेला पूर्वी प्रमाणेच भाजपकडून अपेक्षा होती. भाजप आणि शिवसेनेमध्ये जेव्हा चर्चा व्हायची तेव्हा भाजपाचं वरिष्ठ नेतृत्व चर्चेसाठी मातोश्रीवर जायचं. उद्धव ठाकरे यांना देखील अशीच अपेक्षा होती असंही शरद पवार यांनी आपल्या पुस्तकात म्हटल्याची माहिती समोर येत आहे.