महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . १ मे । आयपीएलने रविवारी १०००व्या सामन्याचा विक्रम केला. प्रथमच चारही संघांनी एकाच दिवशी २००+ धावा केल्या. पहिल्या सामन्यात चेन्नईने ४ गडी गमावत २०० धावा केल्या. प्रत्युत्तरात पंजाबने ६ गड्यांच्या मोबदल्यात २०१ धावांचे लक्ष्य गाठले. दुसऱ्या सामन्यात राजस्थान रॉयल्सने ७ गडी गमावत २१२ धावा केल्या. उत्तरात मुंबई इंडियन्सने ३ चेंडू शिल्लक ठेवून २१४ धावा करत विजय मिळवला. बीसीसीआयने १०००व्या सामन्याचा जल्लोषही साजरा केला. पहिल्या आयपीएलचा (१८ एप्रिल २००८) भाग राहिलेले सचिन तेंडुलकर व कुमार संगकाराचा सन्मानही करण्यात आला.
यशस्वीने गाजवला दिवस
१०००व्या सामन्यात अनेक स्मरणीय क्षण जोडले गेले. राजस्थान रॉयल्सच्या यशस्वी जायस्वालने आयपीएल करिअरचे पहिले शतक केले. १६ चौकार, ८ षटकारांच्या मदतीने ६२ चेंडूंत १२४ धावा केल्या. या मोसमात शतक करणारा तो पहिला अनकॅप्ड खेळाडू आहे. एखाद्या अनकॅप्डची ही सर्वात मोठी धावसंख्या आहे. आयपीएलचे पहिले शतक ब्रँडन मॅक्कुलमने केले होते. १०००वा सामना मुंबई इंडियन्सच्या नावे राहिला. त्यांनी राजस्थान रॉयल्सचा ६ गडी राखून पराभव केला. ९९९व्या सामन्यामध्ये किंग्ज इलेव्हन पंजाबने चेन्नईचा ४ गड्यांनी पराभव केला.