महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .११ मे । पिंपरी- चिंचवड शहराचे तापमान 37 अंशावरून बुधवार (दि. 10) 41 अंशावर गेले आहे. घामाच्या धारा आणि अंगाची लाहीलाही यामुळे नागरिकांना उकाडा नकोसा झाला आहे. शहराचे बुधवारचे कमाल तापमान 41 अंश इतके होते. बुधवारी 4 अंशांनी तापमान वाढल्याने कुलर व फॅनचाही उपयोग नसल्यासारखे झाले आहे. तर दिवसभर एसीची हवा खात कार्यालयात काम करणार्या कर्मचार्यांना कार्यालयाबाहेर पडल्यानंतर अचानक उकाड्याचा सामना करावा लागल्याने प्रकृतीवर परिणाम होत आहे.
सध्या लग्नसराई सुरु असल्याने दुकानांमध्येही गर्दी पहायला मिळत आहे. मात्र, उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना खरेदीचा आनंद घेता येईनासा झाल्याचे दिसून येत आहे. भट्टी आणि हॉटेल्सच्या किचनमध्ये काम करणारे, वेठबिगारी कामगार यांचे वाढत्या तापमानामुळे प्रचंड हाल होत आहेत. घरातही दिवसरात्र पंखे व वातानुकुलित यंत्रणेचा वेग वाढवूनही थंडावा मिळत नाही. तसेच या उपकरणांना आरामही मिळत नसल्याने नागरिक सायंकाळी व रात्री उद्यानात किंवा मोकळ्या जागी बसून गारवा मिळविण्याचा प्रयत्न करत आहेत.