महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .११ मे । महापालिकेच्या पार्किंग धोरणाला विरोध झाल्यानंतर या धोरणाची अंमलबजावणी कागदावरच राहिली आहे. हे पार्किंग धोरण सध्या प्रायोगिक तत्त्वावर काही ठिकाणी राबविले जात आहे. ते पुनरुज्जीवित करुन सर्व शहरात राबविण्याचे नियोजन सध्या सुरु आहे. प्रमुख मार्गांवर त्यानुसार कार्यवाही करण्याच्या दृष्टीने हालचाली सुरु झाल्या आहेत. याबाबत पुढील आठवडाभरात बैठक घेऊन निर्णय घेतला जाणार असल्याचे महापालिकेचे कार्यकारी अभियंता बापू गायकवाड यांनी सांगितले.
शहरातील 13 मुख्य रस्ते व उड्डाणपुलाखाली काही जागांवर पार्किंगची व्यवस्था करण्याचे नियोजन यापूर्वी निश्चित केलेल्या पार्किंग धोरणात केलेले आहे. त्यानुसार शहरात एकूण 450 पे अॅण्ड पार्कची ठिकाणे ठरविली होती. तसेच, 1 जुलै 2021 पासून त्याच्या अंमलबजावणीला सुरुवात झाली होती. मात्र, नागरिकांच्या प्रचंड विरोधामुळे ही योजना गुंडाळण्यात आली. महापालिकेचे कार्यकारी अभियंता बापू गायकवाड म्हणाले की, पार्किंग धोरणातंर्गत सध्या चिंचवडगाव येथील चापेकर चौक आणि संत मदर तेरेसा उड्डाणपूल (चिंचवडस्टेशन) आदी ठिकाणी प्रायोगिक तत्त्वावर ‘पे अॅण्ड पार्क’ सुरु केले आहे.
महापालिकेकडून पार्किंग धोरण पुनरुज्जीवित केले जाणार आहे. हे धोरण राबविण्यासाठी मोबाईल अॅप विकसित केले आहे. त्या माध्यमातून धोरणाची अंमलबजावणी करणे सोपे होईल. हे धोरण योग्य पद्धतीने कार्यान्वित करण्यासाठी पुढील आठवड्यात बैठक घेऊन नियोजन केले जाणार आहे.